Friday, November 22, 2024
HomeनाशिकChhagan Bhujbal: ईडीचा त्रास वाचवण्यासाठी आपण भाजपसोबत गेलो? मंत्री छगन भुजबळ यांनी...

Chhagan Bhujbal: ईडीचा त्रास वाचवण्यासाठी आपण भाजपसोबत गेलो? मंत्री छगन भुजबळ यांनी अखेर खरं कारण सांगितलं

नाशिक | Nashik
ईडीचा त्रास वाचवण्यासाठी आपण भाजपसोबत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले असल्याचा दावा करणारे एक वृत्त प्रकाशित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. संबंधित पुस्तकावर कायदेशीर कारवाईचा विचार सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगत या वृत्ताच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित केले. या आरोपांवर आज भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या हवाल्याने एका वृत्तपत्रात मोठे दावे करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. या पुस्तकात ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाखाली राज्यातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामागील कथित सत्य नमूद करण्यात आले आहे. यात छगन भुजबळ, शरद पवार, अजित पवार, सुनिल तटकरे, अनिल देशमुख यांसह अनेक नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.

- Advertisement -

काय म्हणाले छगन भुजबळ?
या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, छगन भुजबळ यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, आपण वृत्तपत्राला कोणतीही मुलाखत दिली नाही. आम्ही अजित पवारांच्या नेतृ्त्वात भाजपसोबत गेल्यानंतर आमच्यावर आधीपासूनच आरोप होत आहेत. विकासाच्या भूमिकेतून भाजपला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हा मुद्दा कसा उपस्थित झाला, यावर भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला.

छगन भुजबळ यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मला क्लिनचीट मिळाली आहे. ही क्लिनचीट मला भाजपसोबत आल्यावर नाही मिळाली तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मिळाली आहे. माझ्यावर ईडीची कारवाई झाली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने तुरुंगाबाहेर आलो. आमच्यासोबत असणाऱ्या ५० पैकी सगळ्याच आमदारांवर ईडी चौकशी नव्हती, असेही भुजबळांनी सांगितले. भाजपसोबत सत्तेत गेल्याने मतदारसंघात चांगली कामे सुरू झाली. आज मतदारसंघात विकास कामे सुरू आहेत. आम्ही विकासासाठी गेलो होतो असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. तसेच, राजदीप सरदेसाई यांचे ‘२०२४: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ हे पुस्तक काही दिवसांनी वाचेन, माझ्या वकिलांनाही देईन आणि त्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करेन, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या