नाशिक | Nashik
नाशिकच्या जागेवर कुणाला उमेदवारी दिली जाणार? याबाबत महायुतीत (Mahayuti) वारंवार खलबते झाली. हेमंत गोडसे (Hemant Tukaram Godse) हे शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) मागील दोन टर्म राहीलेले खासदार आहेत. ते पुन्हा एकदा या ठिकाणाहून लढण्यासाठी इच्छुक आहेत. शिवाय भाजपकडूनही या जागेवर दावा केला जात होता. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळही (Minister Chhagan Bhujbal) ही जागा लढण्यास इच्छुक होते. त्यातच आज महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आहे. गोडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले, हेमंत गोडसे यांचे नाव अपेक्षित आहे. हेमंत गोडसे सध्या सीटिंग एमपी आहेत. ते खासदार आहेत. त्यांचा आग्रह मुख्यमंत्री शिंदे साहेबांनीसुद्धा केला होता.हेमंत गोडसे यांचे मनापासून अभिनंदन करतो. आतापासूनच प्रचाराची सुरुवात वेगात होईल. भारती पवार आणि हेमंत गोडसे यांचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम उद्या होईल. यावेळी देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे.’
भुजबळ समर्थक नाराज?
छगन भुजबळ निवडणूक रिंगणात नसल्याने समता परिषदेच्या पदाधिकारी नाराज झाले आहे. दिलीप खैरे हे छगन भुजबळांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. ते नाशिकमधून ३ मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून ते ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी देखील समता परिषद उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे जर दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर नाशिकमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.