नाशिक | Nashik
देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून उद्या (दि.२०) रोजी पाचव्या टप्यातील मतदान (Voting) पार पडणार आहे. मात्र, त्याआधीच विविध पक्षांच्या नेत्यांनी वृत्तवाहिन्यांसह वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत मोठे गौप्यस्फोट केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी बोलतांना “२००४ मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भविष्यात पक्ष फुटला असता, असे म्हटले होते. त्यावर भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “ज्यावेळी १९९५ साली युतीचे सरकार गेले त्यावेळी मला शरद पवारांनी विधानपरिषदेवर आमदार केले. त्यावेळी मी विरोधीपक्षनेता म्हणून काम केले. त्या कालावधीत मी विरोधीपक्षनेता म्हणून भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात काम केल्याने माझ्या घरावर अनेक हल्ले झाले. त्यानंतर १९९९ मध्ये शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हा मला शरद पवार यांच्यासोबत जाऊ नका, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ असे काँग्रेसने सांगितले होते, मात्र मी शरद पवारांची साथ दिली. नाहीतर त्यावेळीच मी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो”, असे छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) म्हटले.
तसेच भुजबळ पुढे म्हणाले की, “२००४ साली विधानसभेच्या राष्ट्रवादीकडे सर्वाधिक जागा होत्या. त्यावेळी कॉंग्रेस आम्हाला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती. मात्र, शरद पवारांनी तेव्हा मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला. नाहीतर त्यावेळीही मी मुख्यमंत्री झालो असतो, असेही भुजबळ यांनी म्हटले. दरम्यान, आता भुजबळांच्या या विधानानंतर शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे आहे.