मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (chhagan Bhujbal) हे मंत्रीपद न मिळाल्याने महायुतीमध्ये नाराज होते. अखेर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असून उद्या सकाळी ते राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
मंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असणारे अन्न व नागरी पुरवठा खाते मिळणार असल्याचे समजते.
दरम्यान, या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 50 मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नाशिकमधील कार्यकर्ते मुंबईला रवाना
छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाची वार्ता कळताच नाशिक मधील भुजबळ समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी महायुतीकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भुजबळ यांना मंत्रीपद देऊन खेळी खेळल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्या रुपाने ओबीसी नेतृत्व या आधी मंत्रिमंडळात होतं. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळांच्या रुपाने ओबीसी नेता मंत्रिमंडळात असणार आहे.
नाशिक जिल्ह्याला चार मंत्रीपदे
छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला आता चौथे मंत्रिपद मिळणार आहे. यापूर्वी शिवसेनेचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ हे तीन मंत्री आहेत. आता भुजबळ यांच्या रुपाने चौथे मंत्रिपद जिल्ह्याला मिळणार आहे. एकाच जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन मंत्री आता होणार आहेत.