Friday, May 3, 2024
Homeनगरपक्षाचे नाव, चिन्ह याच्याशी सर्वसामान्यांना देणे-घेणे नाही

पक्षाचे नाव, चिन्ह याच्याशी सर्वसामान्यांना देणे-घेणे नाही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. त्यांनी जो निर्णय घेतला आहे, कोणत्या पक्षाला कोणते नाव, कोणते चिन्ह मिळाले याच्याशी सर्वसामान्यांना देणे घेणे नाही. आता सरकारने मागील प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे स्पष्ट मत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी येथे व्यक्त केले.

- Advertisement -

नगर महापालिकेच्या आवारात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन शिवजयंतीदिनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याहस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात व मंत्रोच्चारात हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमास खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले आदींसह मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. खासदार संभाजीराजे यांच्याहस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. 60 ते 70 लाख रूपये खर्च करून उभारण्यात येणार्‍या पुतळ्याचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे.

संभाजीराजे म्हणाले, राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपीसीच्या निधीतून तीन टक्के निधी उपलब्ध केल्याचे सांगितले असले, तरी सदरचा निधी हा गड-किल्ल्यांसह इतर स्मारकांसाठीही आहे. त्यामुळे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी हा निधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, चौथे शिवाजी महाराज व नगर यांचा जवळचा संबंध आहे. नगरमध्ये त्यांची समाधीही आहे. खासदार असताना या स्मारकाच्या कामासाठी 34 लाख रूपयांचा निधी मी दिला होता. आता मी खासदार नाही. या कामाची वर्क ऑर्डर ही निघाली आहे. मात्र, अद्याप निधी रिलीज झालेला नाही. याबाबत खासदार सुजय विखे यांनी पाठपुरावा करावा. त्यांचे सरकार असल्याने त्यांनी यात लक्ष घालून निधीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या