राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहरात बुधवार दि. 26 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेच्या निषेधार्थ काल गुरूवार दि. 27 मार्च रोजी शहरातील बाजारपेठेसह आठवडे बाजार बंद ठेवत शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळला. या बंदला व्यापार्यांनी प्रतिसाद दिला. राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री बुवासिंद बाबा तालीमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तमाम शिवप्रेमींकडून तिव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ काल दि. 27 मार्च 2025 रोजी समस्त शहरवासीयांच्या वतीने दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनात उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस प्रमुख दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आदींसह अनेक अधिकारी शहरात दिवसभर ठाण मांडून होते.
दंगल नियंत्रण पथक, पोलिस पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथकाचा शहरातील शनीचौक, शिवाजी चौक, शुक्लेश्वर चौक, पृथ्वी कॉर्नर अशा प्रत्येक चौकात तसेच घटनास्थळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी 18 पोलीस अधिकारी, 91 पोलीस कर्मचारी, शिघ्र कृती दलाचे दोन प्लाटून, राज्य राखीव पोलीस बलाचे दोन प्लाटून असा सुमारे दोनशे पोलीस कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरवासीयांच्यावतीने कालचा आठवडे बाजार तसेच संपूर्ण शहर दिवसभर स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
या घटनेच्या निषेधार्थ अनेक सामाजिक संघटनांकडून निषेध नोंदविला जात आहे. तसेच मुस्लिम समाजाकडूनही आरोपीस कठोरात कठोर शासन व्हावे, यासाठी निवेदन देण्यात आले आहे. तसेच राहुरी तालुका बार असोशिएनने या घटनेचा निषेध करून आरोपींचे वकिलपत्र न घेण्याचे ठरविले. तालुक्यातील वांबोरी, वळण, बारागाव नांदूर, कनगर, गुहा, ताहराबाद, टाकळीमिया, देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, म्हैसगाव, ब्राम्हणी, उंबरे, सोनगाव, सात्रळ, धानोरे, तांभेरे, कानडगाव, राहुरी स्टेशन, आरडगाव आदींसह तालुक्यातील ग्रामिण भागात या घटनेचा निषेध व्यक्त करून कडकडीत बंद पाळण्यात आला.
मी सध्या कामानिमित्त परदेशात असून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करण्याचे कृत्य ज्याने केले. त्या आरोपीस पोलीस प्रशासनाने आपली पूर्ण ताकद पणाला लावून कठोरात कठोर शासन करावे. आमच्या सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. जोपर्यंत पोलीस प्रशासन आरोपीला पकडून कठोरात कठोर शिक्षा करत नाही, तोपर्यंत आम्ही राहुरीकर शांत बसणार नाही.
– माजी मंत्री प्राजक्त तनपुरे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना खपवून घेतली जाणार नाही. पोलीस प्रशासनाने जो कोणी माथेफिरू असेल, त्याचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी. मी गृह विभागास पत्र देऊन त्या माथेफिरूवर जास्तीत जास्त कठोर कारवाई कशी करता येईल? याबाबत मागणी करणार आहे.
– खा. निलेश लंके, अहिल्यानगर, दक्षिण