Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याडॉ. दत्ता सामंत हत्या प्रकरणात छोटा राजनची निर्दोष मुक्तता

डॉ. दत्ता सामंत हत्या प्रकरणात छोटा राजनची निर्दोष मुक्तता

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

गिरणी कामगारांच्या चळवळीतील लढवय्ये नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली. राजनविरुद्ध सबळ पुरावे सादर करण्यात आले नाहीत, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने राजनला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले. डॉ. दत्ता सामंत यांची १९९७ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. छोटा राजन हा डॉ. सामंत यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचा आरोप होता. मात्र सबळ पुराव्यांअभावी राजन निर्दोष सुटल्याने सीबीआयला झटका बसला आहे.

- Advertisement -

१६ जानेवारी १९९७ रोजी कामगार नेते डॉ. दत्ता सामंत हे पद्मावती रोडवर जीपमधून पवई येथून घाटकोपरला जात होते. याचवेळी चौघा हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. मोटारसायकलवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी डॉ. सामंत यांची जीप अडवली आणि त्यांच्यावर १७ गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारात गंभीर दुखापत झाल्यानंतर डॉ. सामंत यांना अनिकेत नर्सिंग होममध्ये उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र तेथे उपचार सुरु करण्याआधीच त्यांना मृत घोषित केले होते. त्यानंतर डॉ. सामंत यांच्या गाडीचा चालक भीमराव सोनकांबळेच्या तक्रारीवरून चार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

छोटा राजनने डॉ. दत्ता सामंत यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप सीबीआयने केला होता. याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यापुढे खटला चालला. मात्र छोटा राजनच्या सहभागाचे सबळ पुरावे सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. तपास यंत्रणेच्या याच अपयशावर बोट ठेवत विशेष न्यायालयाने शुक्रवारी डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्या प्रकरणात छोटा राजनची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका केली.

राजनला ऑक्टोबर २०१५ मध्ये इंडोनेशियातील बाली येथून अटक करण्यात आली होती. त्यावेळी सीबीआयने त्याच्याविरुद्ध नोंदवलेले सर्व खटले ताब्यात घेतले होते. त्याच दरम्यान डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजनवर खटला चालवण्यात आला. मात्र राजनविरुद्ध सबळ पुरावे सादर करण्यात केंद्रीय तपास यंत्रणेला अपयश आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या