अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सह व्यवस्थापकीय संचालक विद्युत वितरण पारेषण (छत्रपती संभाजीनगर) तथा मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने यांनी शहरात सखोल पाहणी करत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी (जळगाव) श्रीमंत हरकर हे उपस्थित होते.
या दौर्यादरम्यान निरीक्षकांनी सर्वप्रथम निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट देत निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर स्ट्राँग रूमची तपासणी करत सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. स्ट्राँग रूममधील दरवाजे, खिडक्या तसेच सीसीटीव्ही कॅमेरे अद्ययावत व सक्षम पध्दतीने बसवावेत, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. यानंतर निरीक्षकांनी शहरातील आनंदनगर येथील शाळांमधील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील मूलभूत सुविधा, मतदान केंद्रांची रचना, सुरक्षितता व्यवस्था व व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुधारणा तत्काळ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने केडगाव येथील पाच गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या सुरू असलेल्या प्रक्रियेचीही पाहणी केली. या प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता, अचूकता व सुरक्षेचे सर्व निकष पाळले जात असल्याची खात्री करून घेत आवश्यक सूचना देण्यात आल्या. मनपा मुख्यालयात निवडणूक अधिकारी, आचारसंहिता नोडल अधिकारी, खर्च तपासणी पथक प्रमुख तसेच शहर पोलीस उपअधीक्षक यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत आदर्श आचारसंहिता, खर्च नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था तसेच निवडणूक व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मागील निवडणुकीतील मतदान टक्केवारीपेक्षा यावर्षी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवावेत, अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षकांनी दिल्या. निवडणुकीदरम्यान अवैध हालचालींना आळा घालण्यासाठी महामार्गावरील तपासणी नाक्यांवर कडक वाहन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शहरातील संवेदनशील भागांची माहिती पोलीस प्रशासनाकडून घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या पाहणी दौर्यावेळी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यशवंत डांगे, शहर पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ व संभाजी गायकवाड, जल अभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता श्रीकांत निंबाळकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





