Tuesday, January 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ४५ लाख लाडक्या बहिणींवर संक्रांत; २६...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ४५ लाख लाडक्या बहिणींवर संक्रांत; २६ लाख महिलांना ई- केवायसी नंतरही पैसे नाहीत



मुंबई / प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई केवायसी लागू केल्याने त्याचा फटका जवळपास ४५ लाख बहिणींना बसला आहे. ई केवायसी केल्यानंतरही २६ लाख महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. आता या २६ लाख महिलांनी ऑनलाइन भरलेल्या माहितीची पडताळणी होणार असून याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे.

राज्य सरकारने २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडीच कोटींहून अधिक महिलांनी यात नोंदणी केली. यामध्ये सरकारी नोकरीतील महिला तसेच काही पुरुषांकडूनही नोंदणी करण्यात आली होती. अशा बोगस लाभार्थ्यांना या योजनेमधून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून ई केवायसी नोंदणी मोहीम राबविण्यात आली. यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली. अंतिम मुदतवाढ ही ३१ डिसेंबर २०२५ ही होती.

- Advertisement -

मात्र त्यानंतरही राहिलेल्या २ कोटी ३५ लाख महिलांमधील केवळ १ कोटी ९० लाख महिलांचीच ईकेवायसी नोंदणी पूर्ण झाली. ३१ डिसेंबरची मुदत उलटून गेल्यानंतर आणि त्याकाळात नगरपालिका, महापालिका निवडणुकीमुळे नवीन मुदतवाढ देण्यात आली नाही. याचा फटका सुमारे ४५ लाख महिलांना बसला असून त्या या योजनेतून बाद झाल्या आहेत. महिला आणि बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिलांना दोनदा मुदतवाढ देऊनही त्या नोंदणीसाठी पुढे न आल्याने त्यांना आता या योजनेतून बाद करण्यात आले आहे. अशा महिलांसाठी नवीन मुदतवाढ देण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप विभागाकडे नाही.

YouTube video player

ई केवायसीत निवडला चुकीचा पर्याय
जवळपास २६ लाख महिलांनी ई केवायसीत चुकीचा पर्याय निवडला. यामध्ये कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीत आहे किंवा नाही याची नोंद करताना या महिलांकडून गल्लत झाल्याचे महिला आणि बालविकास विभागाचे म्हणणे आहे. याची पडताळणी आता अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येणार आहे. या सर्व २६ लाख महिलांची यादी संबंधित जिल्ह्यांत पाठविण्यात आली असून घरोघरी जाऊन या महिलांच्या घरात खरोखरच सरकारी नोकरीतील व्यक्ती आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच या महिलांना योजनेचा हप्ता सुरू होणार आहे.

अंगणवाडी सेविकांचा पडताळणीस नकार
दरम्यान, या महिलांची पडताळणी करण्यास अंगणवाडी सेविकांकडून नकार देण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेत अर्ज बाद झाल्याने अंगणवाडी सेविकांना या महिलांकडून उलटसुलट प्रश्न केले जात असून प्रसंगी त्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी या कामास विरोध दर्शवला आहे.

ताज्या बातम्या

फिर्यादीच निघाला वाहनचोर…

0
लासलगाव | वार्ताहर Lasalgaon दोन फायनान्स कंपन्यांचे कर्ज बुडवण्यासाठी स्वतःची कार चोरीला गेल्याची खोटी तक्रार देणार्‍या तरुणाचा डाव लासलगाव पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत उघडकीस आणला....