राहाता/एकरुखे |तालुका प्रतिनिधी| Rahata
अंगणवाडीत शिकत असलेला चिमुरडा एकाच्या दुचाकीवर बसतो. एका वस्तीवर सोडायचे तर गैरसमजातून त्याला दुसर्याच वस्तीवर सोडले जाते. ज्या वस्तीवर सोडले, त्यांना वाटले, सोडणार्याचा नातू आहे. ते पुन्हा नेण्यास येतील. दुसरीकडे चिमुरड्याचे अपहरण झाल्याची खात्री होते. सोशल मीडियावर फोटोसह अपहरणाची माहिती प्रसारित होते. अन् चिमुरडा त्या वस्तीवर सुखरूप असल्याचे समजल्यावर चिमुरड्याच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रु येतात. ही घटना गुरुवारी तालुक्यातील वाकडी येथे घडली.
वाकडी येथील अंगणवाडीतील चिमुकल्याचे अपहरण झाल्याच्या संशयावरून काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण होऊन जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर येते. अपहरण झालेला चिमुकला गावातील नांदूर रस्त्यावरील एका वस्तीवर सुखरूप सापडताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वाकडी श्रीरामपूर रस्त्यावर असलेल्या गोरे वस्ती येथील शिवम निलेश गोरे हा चिमुकला अंगणवाडीची सुट्टी झाल्यावर आजी व लहान चिमुकल्या भावासोबत घरी निघाला. विद्यालयालगत एका अनोळखी दुचाकीस्वाराने घरी सोडू का? असे विचारून गाडी थांबविली. त्याच क्षणी शिवम गोरे हा चिमुकला तात्काळ दुचाकीवर मागे बसला. सोबत असलेल्या आजीने दुचाकीस्वारास ओळखले नाही.
मात्र हा दुचाकीस्वार व्यक्ती कदाचित आम्हाला ओळखत असेल या उद्देशाने आजीने मुलास पुढे वस्तीवर सोडा, असे सांगितले. थोड्या वेळाने आजी घरी पोहचली. चिमुकला घरी आला नसल्याचे निदर्शनास आल्यावर सर्वांची धावपळ सुरू झाली. घटनेची माहिती वार्यासारखी गावात पसरली. मुलाचे अपहरण झाल्याचा सर्वांना संशय आल्याने तात्काळ श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथक घटनेच्या ठिकाणी हजर झाले. चिमुकला दुचाकीवर बसलेल्या ठिकाणाहून ते गावातील इतर भागात जाणार्या रस्त्यावर व परिसरातील दुकानातील सिसिटीव्ही कॅमेरा चेक करण्यास सुरुवात केली. गोरे वस्ती व गावातील काही तरुण वाडी वस्ती व परिसरातील रस्त्याच्या कडेचा भागात शोध घेत होते.
श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डोले, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर ढोकणेे, स्थानिक गुन्हे शाखा आदींनी परिसरातील सिसिटीव्ही कॅमेर्यांची तपासणी केली असता त्यात फारसे काही स्पष्ट दिसले नाही. थोड्या वेळाने पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर घटनास्थळी दाखल होत अपहरण झालेल्या चिमुकल्याच्या आजी व नातेवाईकांकडून माहिती घेत असताना त्याच वेळी मुलगा नांदूर रस्त्यावरील शिंदे वस्तीवर सापडल्याचा फोन मुलाच्या वडिलांना आला. तात्काळ त्या ठिकाणी जाऊन मुलास सुखरूप ताब्यात घेतले.
गावातीलच शेळके नावाच्या व्यक्तीने गोरे वस्तीवर सोडण्याऐवजी शिंदे वस्तीवरचा आहे असे समजून नांदूर रस्त्यावरील शिंदे वस्तीवर रस्त्याच्या कडेला सोडून पत्नी शिक्षिका असलेल्या लांडेवाडी येथील अंगणवाडी येथे त्यांना घेण्यास गेले. शेळके यांचा हा नातू कदाचित थोडा वेळ इथे सोडला असावा व जाताना घेऊन जाईल, असे शिंदे कुटुंबास वाटले. मात्र बराच वेळ होऊनही हा मुलाला घेण्यास कोणी आले का नाही? असा विचार करून शिंदे कुटुंबियांनी घरी आलेल्या पशुवैद्यकीय डॉ. लहारे यांना ही माहिती सांगितली असता हा मुलगा गोरेंचा आहे. ते दुपारपासून शोध घेत आहे, असे सांगून मुलाचे वडील निलेश गोरे यांना फोन करून मुलगा सुखरूप असल्याची माहिती दिल्यावर हा चिमुकला सुखरूप पोहचला.




