संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर व कर्जुले पठार येथील दगडखाणीवर काम करणार्या 38 वेठबिगार कामगार व 31 बालकामगारांची मुक्तता करण्यात आली. मुक्तता करण्यात आलेल्या 38 वेठबिगार कामगारांत 22 पुरूष व 16 महिला कामगार आहेत. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना काल सकाळी प्राप्त झालेल्या तक्रारीवर प्रशासनाने ही तत्परतेने कारवाई केली आहे.
मुक्तता करण्यात आलेले सर्व वेठबिगार व बालकामगार पालघर जिल्ह्यातील असून तहसीलदारांच्या स्वाक्षरीने बंधमुक्तता प्रमाणपत्र देऊन पोलीस संरक्षणात त्यांना पालघर येथे रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली ही मुक्तता मोहीम राबविण्यात आली.
सरकारी कामगार अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह 10 ते 12 जणांच्या तीन पथकांच्या माध्यमातून ही धडक कारवाई करण्यात आली. मुक्तता केलेल्या स्त्री, पुरुष व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. वेठबिगारीतून मुक्त झालेल्या कामगारांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत. दरम्यान, ठेकेदार श्री. राठोड यांच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात ट्रॉसिटी कायदा व वेठबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम, 1976 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.