Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखनिसर्गप्रेमाचा वारसा मुलांनी पुढे न्यावा

निसर्गप्रेमाचा वारसा मुलांनी पुढे न्यावा

राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी पाणथळ जागी असलेली अभयारण्ये प्लास्टिकमुक्त ठेवण्याची शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीत घेतली. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशात ७५ रामसर स्थळे आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वरचा समावेश आहेत. रामसर म्हणजॆ पाणथळ जागा. ७५ ठिकाणी स्थानिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या त्या ठिकाणी सुरु असलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माहितीचे यावेळी आदानप्रदान करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले गेले. मुलांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. यानिमित्ताने मुलांना निसर्ग आणि मानवाचे अतूट नाते आणि एकमेकांवर अवलंबून असेलेले अस्तित्व हे कदाचित समजू शकेल. राज्यातील ४५ प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती अती संकटग्रस्त आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री या संस्थेने अशा पक्ष्यांची यादी जाहीर केली आहे. राज्यात दोनच माळढोक राहिले आहेत. गिधाडे अभावानेच नजरेस पडतात. क्षेत्रबलाक हा स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने यायचे. तथापि गेली अनेक वर्षे ते आले नसल्याने ते नामशेष झाले असावेत. अशी अस्वस्थ करणारी अनेक निरीक्षणे या संस्थेने नोंदवली आहेत. पक्षीतज्ज्ञ त्याची अनेक कारणे सांगतात. पाणथळ जागा नष्ट होणे हे त्यापैकी एक कारण. पाणथळ जागा म्हणजे रामसर निसर्ग संवर्धन करण्यात उभरत्या पिढीचा सहभाग मोलाचा आहे. निसर्गप्रेमासाठी फक्त पुस्तकी शिक्षण आणि उपदेश पुरेसे ठरतील का? ते ज्ञान तर द्यायलाच हवे. ‘एखाद्याशी मैत्री जमवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या मैत्रीचा हात त्याच्या पुढे करणं’ असे पु.ल. देशपांडे म्हणत. निसर्गावरची व्याख्याने, टॉक शो, स्लाईड शो, तज्ज्ञांशी गप्पा, निसर्ग संवर्धनासाठी सुरु असलेले प्रयत्न त्यांच्यापर्यंत पोचायला हवेत. मुले निसर्गाच्या सानिध्यात काही काळ रमली पाहिजे. निसर्गाचे संगीत त्यांनी ऐकले पाहिजे.वृक्षांच्या स्थानिक प्रजाती, वनस्पती, पक्षी त्यांना ओळखता आले पाहिजेत. तसे ते आले म्हणजे निसर्गाच्या साखळीतील त्यांचे महत्व मुलांना आपोआपच उलगडू शकेल. ती संधी मुलांना उपलब्ध करून देणे हे पालकांचे देखील कर्तव्य आहे. निसर्गात रमणे म्हणजे वेळ वाया घालवणे नाही हे आधी लक्षात घ्यायला हवे. मुलांनी फक्त अभ्यास करावा असा बहुसंख्य पालकांचा आग्रह असतो. तथापि आयुष्य जगण्यासाठी अनेक कौशल्यांची गरज असते. त्यात निसर्ग देखील महत्वाची भूमिका बजावतो. निसर्गाचा छंद मुलांच्या आयुष्यात आनंदही निर्माण करेल. छंद माणसाला आनंदाने जगायला शिकवतात. हे पालकांना कळते तसे वळायला देखील हवे. अर्थात अनेक पालकांना ते उमगले आहे. पण त्या पालकांची संख्या ‘दिन दुगनी, रात चौगुनी’ अशी वाढायला हवी. त्यासाठी वर उल्लेख केलेले उपक्रम पूरक ठरतात. निसर्गाचा वारसा विद्यार्थ्यांनाच पुढे न्यायचा आहे. पंतप्रधानांना देखील कदाचित तेच सुचवायचे असावे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या