घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…
आपली मुले मोठी झाली आहेत पण आपल्याला आपली मुले लहानच वाटतात. आज ही मुले आधुनिक वातावरणात वाढत आहेत. अभ्यासाचे आधुनिक तंत्रज्ञान ते जाणतात. कोणतीही गोष्ट आकलन करण्याची त्यांची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. जीवनाचा विचार मुले सकारात्मकतेने करू शकतात. सुसंस्कारांमुळे मुलांमधे विवेकशिलता येते जिच्या आधारावर ते समाजात ताठ मानेने जगू शकतात. आपल्या बुद्धिमत्तेचा विकास होताना त्यांना समजत असते की पालकांची आपल्याकडून काय अपेक्षा आहे व आपण ती कशारीतीने पूर्ण करू याचाही विचार करण्याची संवेदनशीलता या मुलांमध्ये आहे. मुलांची बुद्धिमत्ता ओळखून त्यांना चांगल्या गोष्टीसाठी पाठिंबा द्या पण मोठ्या मनाने जमेल तसे सहकार्यही द्या.
अनेक चाचण्यांसारखी बुद्धिमत्ता चाचणीही करता येते. या चाचणीमुळे कोणते क्षेत्र आपल्या मुलाला निवडता येईल याचा विचार करून निर्णय घेता येतो. एखाद्या अवघड प्रसंगातून बाहेर कसे पडता येईल याचाही विचार मुले करतात. त्यांचा स्वतःचा असा एक विश्वासू मित्र परिवार असतो जो सदैव त्याच्या विचारांशी सहमत असतो व तो काही चुकत असेल तर मार्गदर्शनही करतो. स्वतःचे कार्यक्षेत्र निवडताना त्यांच्या आकलन शक्तीचा कस लागतो व त्यातून ते जीवनाची दिशा ठरवतात.
एक खूप चांगले उदाहरण मी देऊ इच्छिते. सचिन तेंडुलकर यांचा नुकताच पन्नासावा वाढदिवस झाला. त्याच दिवशी त्यांची टीव्हीवरील मुलाखत मी पाहिली. त्यांनी अतिशय मोकळेपणाने सांगितले की, मला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. माझ्या आई- वडिलांनी कधी या चांगल्या गोष्टसाठी विरोध केला नाही. त्यांनी मला क्रिकेट खेळण्यास मनमोकळेपणाने परवानगी तर दिलीच पण मदतही केली म्हणून मी क्रिकेटच्या क्षेत्रात प्रगती करू शकलो.
सचिन दहा वर्षांपूर्वी स्वतः निर्णय घेऊन या क्रीडा क्षेत्रातून निवृत्त झाले ही गोष्ट फार अभिमानास्पद आहे. इतका मोठा निर्णय व तोही यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना घेणे ही गोष्ट फार अवघड आहे, पण त्यांनी ते करून दाखवले त्यांच्यातील निर्णयक्षमतेमुळे. हा निर्णय ते घेऊ शकले कारण घरातील सर्वांचा त्यांच्या निर्णय क्षमतेवर विश्वास आहे. या महान व्यक्तीच्या उदाहरणावरून आपण पाहू शकतो की त्यांना जीवनात घरच्या सर्वांचा पाठिंबा होता व त्यामुळेच ते जीवनात सर्वोच्च यश प्राप्त करू शकले.
क्रिकेटसारखी अनेक क्षेत्रे आहेत ज्यात आपली मुले प्रगती करू शकतील. नृत्य, नाट्य, अभिनय, संगीत क्षेत्रात ही चांगली प्रगती होऊ शकते. आपल्या बुद्धिमत्तेच्या चांगल्या क्षमतेवर ते चांगले यश मिळवू शकतात. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहा म्हणजे त्यातील महानता समजेल व आपण मुलांच्या पाठीशी उभे राहाल.
(क्रमशः)