नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील चिलेखनवाडी येथील शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातील शासकीय धान्याची चोरी नागरिकांनी पकडून दिली असून याप्रकरणी नेवासा तहसीलच्या पुरवठा निरीक्षक वैशाली शिकारे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरवठा निरीक्षक वैशाली गजानन शिकारे (वय 38) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 2 जुलै रोजी दुपारी चिलेखनवाडीच्या ग्रामस्थांनी तहसीलदार यांना फोन करून शासकीय धान्याची चोरी होत असल्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ तलाठी अनंत लक्ष्मण विरकर यांना सदर ठिकाणी जाऊन चौकशी करण्याचा आदेश दिला. ते तेथे गेले असता एक लाल रंगाचा तीन चाकी पियागो अॅपे रिक्षा (एमएच 16 एई 1065) ग्रामस्थांनी अडवून ठेवली होती. रिक्षातील व्यक्तीचे नाव अनिल भिमा मोरे, रा. शेवगाव असे असल्याचे सांगितले.
या रिक्षात विविध कंपनीच्या प्लास्टीकच्या गोणीत गहू व तांदूळ आढळून आले. रिक्षात 10 गोण्या तांदूळ व 5 गोण्या गहू असा माल आढळून आला. सदर धान्य संशयास्पद आढळल्याने अनिल भिमा मोरे यांच्या विरोधात जिवनावश्यक वस्तू विनीमय अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे फिर्याद आहे. या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक संदीप ढाकणे पुढील तपास करीत आहेत.