Wednesday, February 4, 2026
Homeदेश विदेशभारतीय महिलेला चीनमध्ये विमानतळावर नजरकैदेत ठेवल्याने नवा वाद; नेमकं काय घडलं?

भारतीय महिलेला चीनमध्ये विमानतळावर नजरकैदेत ठेवल्याने नवा वाद; नेमकं काय घडलं?

मुंबई । Mumbai

चीनमध्ये अरुणाचल प्रदेशातील एका भारतीय महिलेला शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Shanghai Pudong International Airport) तब्बल १८ तासांहून अधिक काळ ‘नजरकैदेत’ ठेवल्यासारखी वागणूक देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

- Advertisement -

चीनच्या अधिकाऱ्यांनी या महिलेचा भारतीय पासपोर्ट अवैध असल्याचं सांगत, अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचा अत्यंत आक्षेपार्ह दावा केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) चीनच्या या कृतीवर तीव्र शब्दांत निषेध नोंदवत, हे विधान हास्यास्पद आणि सार्वभौमत्वाचं अस्वीकारार्ह उल्लंघन असल्याचं ठामपणे स्पष्ट केलं आहे.

YouTube video player

ब्रिटनमध्ये आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रेमा वांगजोम थोंगडोक (Prema Wangjom Thongdok) या मूळच्या अरुणाचल प्रदेशातील पश्चिम केमांग जिल्ह्यातील रुपा येथील रहिवासी आहेत. २१ नोव्हेंबर रोजी त्या लंडनहून जपानला जात होत्या. त्यांच्या प्रवासात चीनमधील शांघाय विमानतळावर केवळ तीन तासांचा लेओव्हर (थांबा) होता. मात्र, नियमित सुरक्षा तपासणी सुरू असतानाच, त्यांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली आणि त्यांची अडचण वाढत गेली.

जवळपास १८ तासांपर्यंत प्रेमा थोंगडोक यांना एकाप्रकारे नजरकैदेत ठेवण्यात आलं. विमानतळ अधिकाऱ्यांनी त्यांची कसून चौकशी केली आणि सातत्याने ‘तुम्ही भारतीय नसून मूळच्या चीनच्या नागरिक आहात, चिनी पासपोर्टसाठी अर्ज करा’ असं सांगण्यात आलं. अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट जप्त केला आणि त्यांना जपानकडे जाणारे विमान पकडू दिले नाही. महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्याकडे अधिकृत जपानी व्हिसा असूनही त्यांना हा विचित्र अनुभव घ्यावा लागला. त्यांना या काळात अन्न देखील नाकारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रेमा यांनी X (पूर्वीचं ट्विटर) पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “माझं जन्मस्थान अरुणाचल प्रदेश असल्यामुळे माझा भारतीय पासपोर्ट तिथे लागू होत नाही,” असे आक्षेपार्ह वक्तव्य इमिग्रेशन आणि विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांनी केले. चीनमध्ये गुगलचा वापर करता येत नसल्याने, त्यांना भारतीय अधिकाऱ्यांशी किंवा अन्य कोणाशीही संपर्क साधणे सुरुवातीला शक्य झाले नाही. बऱ्याच प्रयत्नांनंतर, त्या यूकेमधील त्यांच्या मित्रांशी संपर्क साधू शकल्या आणि त्या मित्रांनी शांघायमधील भारतीय दूतावासाला (Indian Embassy in Shanghai) या प्रकाराबद्दल कळवले.

या घटनेची माहिती मिळताच अवघ्या एका तासाच्या आत भारतीय अधिकारी विमानतळावर पोहोचले. प्रेमा यांना त्यांनी खायला दिलं आणि चीनच्या यंत्रणांशी संवाद साधून त्यांची सुटका केली. “भारतीय अधिकाऱ्यांनी मला तिथून बाहेर पडण्यास मदत केली,” असं प्रेमा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं. मात्र, या अधिकाऱ्यांनी त्यांना चीनमधून पुन्हा विमानाचं तिकीट काढून पुढील प्रवास थायलंडमार्गे करण्यास सांगितलं.

चीनच्या या वादग्रस्त भूमिकेचा भारताने कडाडून विरोध केला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या राज्यातील नागरिकांकडे इतर कोणत्याही भारतीय नागरिकांप्रमाणेच वैध भारतीय पासपोर्ट आहे, हे भारताने चीनच्या लक्षात आणून दिले. चीनने केलेले हे वक्तव्य भारताच्या सार्वभौमत्वाचे स्पष्ट उल्लंघन आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर, प्रेमा थोंगडोक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मदत करणाऱ्या यंत्रणांचे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सोशल मीडिया वर्तुळाचे आभार मानले. त्याचबरोबर, त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या गैरप्रकारामुळे त्यांना झालेल्या मानसिक छळ, आर्थिक नुकसान आणि प्रवासातील अडचणी यासाठी चीनने त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...