नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०० टक्के टॅरिफ लावण्याच्या केलेल्या घोषणेच्या कृतीमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील हितसंबंधांना गंभीर नुकसान होत आहे. द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार चर्चेसाठीचे वातावरण बिघडत आहे. चीनच्या अर्थमंत्रालयाच्या प्रवक्तांनी अमेरिकेने लावलेल्या टॅरिफबद्दल बोलताना म्हटले की, मुळात म्हणजे चीनला लढायचे नाहीये. मात्र, चीन युद्धाला घाबरत देखील नाही. आवश्यक असेल तर चीन मोठी कारवाई देखील करेल. चीनकडून एकप्रकारे हा अमेरिकेला मोठा इशारा देण्यात आला. अमेरिकेने चीनवर लावलेल्या टॅरिफमुळे भविष्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे दाट संकेत आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून येणाऱ्या सर्व आयातींवर अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. हा निर्णय १ नोव्हेंबरपासून किंवा त्यापूर्वीच लागू होऊ शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनने दुर्मीळ धातूंच्या निर्यातीवर नवीन नियंत्रण घातल्यामुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला होता. चीनच्या या नियंत्रणांमुळे ते जगाला ओलीस ठेवत आहे, असा आरोप त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला होता. यानंतर आता चीनकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले आहे.
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिकेचा हा निर्णय दुटप्पी धोरणाचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर, चीनला “संघर्ष करण्याची इच्छा नाही, पण लढायला घाबरत नाही,” असेही स्पष्ट केले आहे. तसेच गरज पडल्यास या विरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील असेही सांगण्यात आले आहे.
अमेरिका प्रत्येक वेळी उच्च टॅरिफ लावण्याची भाषा चीनसोबत करतेय. चीनसोबतच्या वाटाघाटीमध्ये ही योग्य भाषा आणि मार्ग नसल्याचे चीनने स्पष्ट म्हटले. अमेरिकेला आवाहन करत चीनने म्हटले की, आम्ही अमेरिकेला त्यांच्या चुकीच्या पद्धती ताबडतोब दुरुस्त करण्याचे आणि स्थिर, निरोगी आणि विकासात्मक चीन-अमेरिका आर्थिक आणि व्यापारी संबंध राखण्याचे आवाहन करतो.
यादरम्यान चीनने म्हटले की, अमेरिकेशी संबंधित जहाजांवर विशेष बंदर शुल्क आकारले जाईल. अमेरिकेच्या नवीन शुल्कांवर प्रतिक्रिया म्हणून हे पाऊल आवश्यक असल्याचे चीनने म्हटले आहे. जर अमेरिका आपल्या भूमिकेवर कायम राहिला, तर चीन आपले कायदेशीर हक्क आणि हितसंबंध जपण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मंत्रालयाने दिला आहे.
दरम्यान, ट्रम्प दक्षिण कोरियामध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार होते, मात्र त्याच्या काही आठवड्यांपूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी ही बैठक रद्द करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प आणखी एक पोस्ट लिहून म्हणाले, “दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या APEC शिखर परिषदेत मी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार होतो. पण आता असे करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




