Monday, May 27, 2024
Homeनगररेल्वेकडून खा. सदाशिव लोखंडे यांच्या आदेशाला केराची टोपली

रेल्वेकडून खा. सदाशिव लोखंडे यांच्या आदेशाला केराची टोपली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राहाता-श्रीरामपूर रस्त्यावरील चितळी येथे रेल्वेच्या भुयारी पुलाखाली प्रचंड पाणी साचल्यामुळे तीन दिवसांपासून वाहतूक बंद झाली आहे.

- Advertisement -

येथील भुयारी पुलाखालील पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करणार असे खा. सदाशिव लोखंडे यांना तीन महिन्यांपूर्वी आश्वासन देणार्‍या रेल्वे अधिकार्‍यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. याप्रश्नी चितळी परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

दौंड-मनमाड रेल्वे लाईनचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुर्वीचे पारंपरीक प्रत्येक रस्त्यावरील रेल्वे गेट बंद करून रेल्वेने भुयारी पुलाचे काम केले आहे. या भुयारी पुलाखालील पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वेलाईन शेजारी शेतकर्‍यांच्या शेतात विहीर खोदून पाणी काढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु देशपातळीवर काम करणार्‍या रेल्वे विभागाच्या इंजिनियरने यासाठी बनवलेली डिझाईन सपशेल फेल ठरली आहे.

चालू वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने तांडव सुरू केले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाऊस होऊन अनेक ठिकाणच्या भुयारी पुलाखाली पाणी साचत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. याचाच प्रत्यय चितळी येथील रेल्वेच्या भुयारी पुलामुळे आला आहे.

जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे सदर भुयारी पुलाखाली पाणी साचून वाहतूक बंद पडली होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.सदाशिव लोखंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रेल्वे विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले होते.

त्यावेळी खास बाब म्हणून चितळी येथील रेल्वे भुयारी पुलाखाली साचणार्‍या पाण्याची जमिनीखाली पाईपलाईन टाकून ‘झिरो पॉईंट’ पर्यंत व्यवस्था करू, असे आश्वासन रेल्वे विभागाचे अ.नगर येथील व्यवस्थापक आशिष शाहू यांनी दिले होते. त्यानंतर तीन महिने उलटले तरी रेल्वेकडून कार्यवाही होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे.

रेल्वे विभागाच्या स्थानिक अधिकार्‍यांनी सदर भुयारी पुलाखालील पाणी उपसण्यासाठी ट्रॅक्टरवरील पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर ट्रॅक्टरने काढलेले पाणी रेल्वे लाईनच्या डीपीमध्ये शिरल्याने रेल्वे विभागाने पाणी उपसणे बंद केले आहे.

अधिकार्‍यांचे कान धरणार : खा. लोखंडे

चितळी येथील रेल्वे भुयारी पुलाखालील पाणी प्रश्न अद्याप जैसे थे आहे. याबाबत खा. सदाशिव लोखंडे यांना विचारले असता हा अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा आहे. सदरचे काम अद्याप का झाले नाही म्हणून रेल्वे अधिकार्‍यांचे कान धरणार असल्याचे खा. सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

अन्यथा गेट तोडो आंदोलन करणार – वाघ

चितळी ग्रामपंचायतीने रेल्वे भुयारी पुलाखालील पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकण्यास रितसर परवानगी दिली होती. परंतु रेल्वेच्या अधिकार्‍यांनी वेळकाढूपणा केल्यामुळे वारंवार या रस्त्यावरील वहातूक ठप्प होत आहे. यास रेल्वे विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. त्यांनी याप्रश्नी तातडीने मार्ग काढला नाही तर ग्रामस्थ गेट तोडो आंदोलन करतील, असा इशारा लोकनियुक्त सरपंच दिपालीताई वाघ यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या