Friday, January 23, 2026
HomeनगरShirdi : नऊ दिवसांत साईचरणी 23 कोटी 29 लाखांचे दान

Shirdi : नऊ दिवसांत साईचरणी 23 कोटी 29 लाखांचे दान

शिर्डीत भक्तीचा सागर || 8 लाख भाविकांचे दर्शन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या ‘शिर्डी महोत्सवात’ साईभक्तांचा जनसागर लोटला होता. 25 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या नऊ दिवसांच्या कालावधीत सुमारे 8 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या काळात भाविकांनी श्रद्धेने तब्बल 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपयांचे भरभरून दान संस्थानच्या झोळीत अर्पण केले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

- Advertisement -

या महोत्सवाच्या काळात देश-विदेशातील भाविकांनी विविध माध्यमांतून दान अर्पण केले. यामध्ये दानपेटीतून 6 कोटी 2 लाख 61 हजार 006 रुपये, देणगी काउंटरद्वारे 3 कोटी 22 लाख 43 हजार 388 रुपये आणि पीआरओ सशुल्क पासद्वारे 2 कोटी 42 लाख 60 हजार रुपये प्राप्त झाले. बदलत्या तंत्रज्ञानासोबत भाविकांनी डिजिटल पेमेंटलाही पसंती दिली. डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक आणि मनी ऑर्डरद्वारे 10 कोटी 18 लाख 86 हजार 955 रुपये जमा झाले आहेत. तसेच 26 देशांच्या परकीय चलनातून 16 लाख 83 हजार 673 रुपये संस्थानला मिळाले आहेत.

YouTube video player

सोन्या-चांदीच्या स्वरूपातही मोठे दान प्राप्त झाले असून त्यात 293 ग्रॅम सोने (किंमत 36.38 लाख) आणि सुमारे 6 किलो चांदीचा (किंमत 9.49 लाख) समावेश आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका साईभक्ताने बाबांच्या चरणी 80 लाख रुपये किमतीचा आकर्षक सुवर्ण-हिरे जडीत मुकुट अर्पण केला. या मुकुटात 153 कॅरेटचे मौल्यवान हिरे आणि 585 ग्रॅम शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे.

गर्दीचे चोख नियोजन करतानाच संस्थानने अन्नदानाची परंपरा मोठ्या प्रमाणावर राबवली. या नऊ दिवसांत 6 लाखांहून अधिक भाविकांनी साई प्रसादालयात मोफत भोजन घेतले. याशिवाय 1 लाख 9 हजार भाविकांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला. 7 लाख 67 हजार लाडू पाकिटांच्या विक्रीतून संस्थानला 2.30 कोटी रुपये प्राप्त झाले तर 5 लाख 76 हजार भाविकांना मोफत बुंदी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

संस्थानला प्राप्त होणार्‍या या दानाचा वापर लोककल्याणासाठी केला जातो. साईबाबा रुग्णालय व साईनाथ रुग्णालयातील उपचार, मोफत भोजन व्यवस्था, शैक्षणिक संस्थांचे संचालन आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी या निधीचा विनियोग केला जात असल्याचे गोरक्ष गाडीलकर यांनी यावेळी स्पष्ट केले. महोत्सवाच्या काळात सर्व विभागांच्या कर्मचार्‍यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...