श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
सिस्पे इन्फिनिटी बिकन कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेले ट्रेडस फायनान्शिअल कंपनीचे संचालक विनायक ज्ञानेश्वर मराठे यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन, अहिल्यानगर यांनी फेटाळून लावला आहे.
सिस्पे इन्फिनिटी बिकन कंपनीचे इतर सर्व संचालक फरार असतानाच विनायक मराठे हे आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईत अडकले होते. आरोपीतर्फे अटक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचा, तसेच संचालक पदाचा राजीनामा दिल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर करण्यात आला. मात्र, सदरील प्रकरणातील मूळ फिर्यादी यांच्या वतीने अॅड. शुभम रमेशराव साके यांनी प्रकरणाच्या गांभीर्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. इतर संचालक परागंदा असून कंपनीसाठी कार्यरत असलेल्या एजंट यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जोपर्यंत प्रमुख संचालकांना अटक होत नाही, तोपर्यंत गुंतवणूकदार व छोट्या नफ्याच्या आमिषाने फसवणूक झालेल्या एजंट यांना न्याय मिळणे अशक्य असल्याचे मत न्यायालयात गुंतवणूकदारांच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. साके यांनी मांडले. तसेच गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तुलनेत जप्त रक्कम खूप कमी असल्याने अशा स्थितीत आरोपींना जामीन दिल्यास गुंतवणूकदारांवर मोठा अन्याय होईल, असा ठाम युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचे सविस्तर युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मराठे यांचा जामीन अर्ज फेटाळला.




