Saturday, May 4, 2024
Homeनगर‘रेमडेसिवीर’ साठी केडगावमध्ये नागरिक रस्त्यावर

‘रेमडेसिवीर’ साठी केडगावमध्ये नागरिक रस्त्यावर

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्ह्यात एकीकडे करोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करण्याकडे

- Advertisement -

पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, अन्न औषध प्रशासनचे आयुक्त अशा सर्वच प्रमुख जबाबदार अधिकार्‍यांचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. खासगी रुग्णालयांत रेमडेसिवीरचा काळाबाजार जोरदारपणे सुरू असून जिल्हा रुग्णालयातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटरवर अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या रुग्णांनाही रेमडेसिवीर पुरवण्यात जिल्हा प्रशासन कमी पडत आहे.

करोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने करोनावर प्रभावी असणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. रेमडेसिवीर मिळत नसल्याचे वास्तव आहे. अनेक ठिकाणी करोना पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. रेमडेसिवीर मिळविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांनी आता आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. अनेक ठिकाणी फिरूनही औषध न मिळाल्याने रविवारी सकाळी केडगाव येथे नागरिकांनी नगर- पुणे महामार्गावरच ठिय्या दिला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.

रविवारी शहरात अनेक ठिकाणी फिरून औषध मिळाली नाहीत. केडगावमधील एका औषध दुकानात हे औषध उपलब्ध असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्यामुळे अनेकांनी तेथे धाव घेतली. मात्र, तेथे अपुरा साठा होता. अनेकांना औषध मिळाले नाही. नवीन साठा येत असल्याचे सांगण्यात आले परंतु कालपासून वाट पाहूनही काही प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईकांनी अखेर रस्त्यावर ठिय्या दिला. याठिकाणी काही नागरिकांकडून या दुकानातून चढ्या भावाने विक्री करत असल्याचा तसेच ठराविक लोकांनाच इंजेक्शन दिले जात असल्याचाही आरोप केला. कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. कोतवाली पोलिसांनी संबंधित मेडिकल चालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली. नंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या चार दिवसांत नगरमध्ये सुमारे शंभरपेक्षा अधिक करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. हा विषय राज्यभरात चर्चेचा झालेला असताना नगर जिल्हा प्रशासन मात्र अद्याप सुस्तच दिसून येत आहे. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ अनेक दिवसांपासून गायब असून, कधी-कधी त्यांचे दर्शन होते. त्यांना जिल्ह्यातील जनतेचे काही देणेघेणे राहिले नसल्यासारखी स्थिती आहे.

सध्या जिल्ह्यात करोना साथरोगाच्या बाबतीत अभूतपूर्व अनागोंदी माजली आहे. अत्यवस्थ रुग्णांना आवश्यक असलेले रेमडिसिवीर इंजेक्शन मिळणे मुश्कील झाले आहे, तर काळ्याबाजारात या इंजेक्शनचा भाव वीस हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हे इंजेक्शन घेणे दिव्य ठरत आहे. या इंजेक्शनसाठी गरजुंना वणवण करावी लागत आहे. जिल्ह्याच्या आरोग्याचे प्रमुख केंद्र असलेल्या जिल्हा रुग्णालयातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे दोन-तीन दिवसांपासून व्हेंटीलेटरवरील अत्यवस्थ रुग्णांनाही रेमडिसिवीर मिळणे बंद झाले आहे.

यापूर्वी रेमडिसिवीरच्या साठ्याचे योग्य नियोजन जिल्हाधिकारी व सर्व संंबंधित अधिकार्‍यांनी केले असते तर जिल्ह्यातच ही परिस्थिती निर्माण झाली नसती. परंतु सध्या सुरू असलेल्या काळ्याबाजाराला जिल्हा प्रशासनच जबाबदार आहे, असेच एकंदरीत चित्र आहे. त्यामुळेच जिल्हा रुग्णालयात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. बाहेर सर्वत्र कृत्रिम तुटवडा निर्माण करून गल्ले भरण्याचे काम सुरू असल्याने सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उभा राहिला आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करून सध्या निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणली नाही, तर जनतेच्या संयमाचा बांध फुटू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या