नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने कालपासून संसदेमध्ये या गीतावर चर्चा सुरू आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत वंदे मातरमवर चर्चेची सुरुवात करताना देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर विरोधी पक्षातील सदस्यांनीही वंदे मातरम वरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. आज राज्यसभेतही याच मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. या चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील प्रत्युत्तर दिले. राज्यसभेमध्ये अमित शहा आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.
अमित शाह काय म्हणाले?
वंदे मातरम गीताला १५० वर्षे झाली आहेत. या महान गीताचा संबंध पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीशी जोडून काही लोक या गीताचे महत्त्व कमी करु पाहात आहेत. वंदे मातरम ही एक अमर रचना आहे जी भारताच्या कर्तव्य आणि देशाप्रति असलेले समर्पण भाव दाखवते. आज वंदे मातरमवर चर्चा करण्याची आवश्यकता का आहे? असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला आहे. मात्र देशाच्या आत्म्याशी संबंधित या घोषणेची प्रासंगिकता आधीही होती. आजही आहे आणि येणाऱ्या काळातही कायम राहणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
नेहरुजींनी वंदे मातरमचे दोन तुकडे केले
अमित शहा यांनी पंडीत नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर आरोप करत सांगितले की, ‘जेव्हा वंदे मातरमला ५० वर्षे झाली तेव्हा नेहरूजींनी त्याचे दोन तुकडे केले. तुष्टीकरणासाठी वंदे मातरमला विरोध करण्यात आला. जेव्हा देश वंदे मातरमचा १०० वा वर्धापन दिन साजरा करत होता तेव्हा इंदिरा गांधी यांनी वंदे मारतमचा जयजयकार करणाऱ्यांना तुरूंगात टाकले होते. देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती.’
येणाऱ्या काळात देशाच्या विकासाचे, महानतेचे घोषवाक्य बनेल
तसेच, ‘वंदे मारतमने आपल्या दैवी शक्तीला विसरलेल्या राष्ट्राला जागे केले. त्याने राष्ट्राच्या आत्म्याला जागृत केले. त्या काळात वंदे मारतम हे देशाच्या स्वातंत्र्याचे कारण होते आणि येणाऱ्या काळात ते देशाच्या विकासाचे आणि महानतेचे घोषवाक्य बनेल. वंदे मारतम ही भारतमातेला गुलामगिरीच्या साखळ्यांपासून मुक्त करण्याची घोषणा होती. वंदे मातरम हे स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा होती. वंदे मातरमने स्वातंत्र्य चळवळीला चालना दिली.’, असे अमित शहा यांनी सांगितले.
वंदे मातरम न म्हणणाऱ्या खासदारांची यादी करणार
अमित शाह यांनी काँग्रेस खासदारांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘वंदे मातरम न म्हणण्याबद्दल विधाने करणाऱ्या आणि सभागृहातून बाहेर पडलेल्या सर्व काँग्रेस खासदारांची यादी मी आज संध्याकाळपर्यंत सभागृहाच्या टेबलावर ठेवेन. या सभागृहातील चर्चेचा रेकॉर्ड असा असावा की काँग्रेस खासदार वंदे मातरमला विरोध करतात. आमच्या सरकारने बंकिमचंद्रांच्या १३० व्या जयंतीनिमित्त एक टपाल तिकिट जारी केले. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आम्ही ‘प्रत्येक घरात तिरंगा’ मोहीम देखील सुरू केली आणि तिरंगा फडकवताना वंदे मातरम म्हणायला विसरू नका असे आवाहन केले.’
अमित शहा यांच्या भाषणानंतर काँग्रेस पक्षाने संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सभागृहामध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शहा यांच्या विधानांना प्रत्युत्तर दिले. आपले भाषण सुरू करण्यापूर्वी खरगे यांनी वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. ते म्हणाले, ‘मी ६० वर्षांपासून हे गाणे गात आहे. जे वंदे मातरम गात नाहीत त्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे. १८९६ मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा वंदे मातरम गायले होते. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसने ‘वंदे मातरम’ हा नारा बनवला. स्वातंत्र्य लढा आणि देशभक्तीपर गीतांना नेहमीच विरोध करण्याचा तुमचा इतिहास आहे. पूर्वी तुम्हाला देशभक्तीच्या नावाची भीती वाटत होती.’, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




