Saturday, April 18, 2026
HomeनगरAhilyanagar : इयत्ता 2 री ते 4 थीसाठी नवीन अभ्यासक्रम होणार लागू

Ahilyanagar : इयत्ता 2 री ते 4 थीसाठी नवीन अभ्यासक्रम होणार लागू

मे मध्ये राज्यव्यापी प्रशिक्षण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी नवीन अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून मे महिन्यात राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाची सखोल माहिती देऊन त्यांची तयारी मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

- Advertisement -

या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते तीन स्तरांवर पार पडणार आहे-राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर. यामुळे प्रशिक्षणाची साखळी मजबूत होऊन राज्यातील सर्व शिक्षकांपर्यंत अभ्यासक्रमातील बदल प्रभावीपणे पोहोचवता येणार आहेत. शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होणार असल्याने त्यापूर्वीच सर्व प्रशिक्षण पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एससीईआरटीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, राज्यस्तरावरील प्रशिक्षण 4 ते 7 मे दरम्यान होईल. त्यानंतर जिल्हास्तर प्रशिक्षण 11 ते 14 मे दरम्यान आयोजित केले जाईल. पुढील टप्प्यात तालुकास्तर प्रशिक्षण 18 ते 30 मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. या नियोजनामुळे प्रशिक्षणाची साखळी वेळेत पूर्ण होऊन शिक्षकांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी सज्ज होता येईल.

नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशिक्षणात अध्यापन पद्धती, मूल्यमापन तंत्र, तसेच अभ्यासक्रमातील बदलांचे स्वरूप यावर विशेष भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी नव्या अभ्यासक्रमात विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्याची सविस्तर माहिती शिक्षकांना दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही माध्यमांतील शिक्षकांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण मिळणार आहे. राज्यभरातील शिक्षकांना एकसमान व प्रभावी मार्गदर्शन मिळावे, हा या प्रशिक्षणामागील मुख्य उद्देश आहे. एकूणच, नव्या अभ्यासक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, त्यातून राज्यातील शिक्षण व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai यंदाच्या जनगणनेच्या कामासाठी पुन्हा एकदा शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. जनगणना करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून राज्य सरकारने यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या...