अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्य सरकार मार्फत राबवण्यात येणार्या मोफत गणवेश योजना 2024-25 साठी राज्य स्तरावरून कापड येणार आहे. हे कापड महिला बचत गटाच्यावतीने शिऊन विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. मात्र, आता शाळा सुरू होण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून अद्याप कापड न आल्याने तालुकास्तरावर असणार्या शिक्षण विभागाच्या अधिकार्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेशाचा मुहूर्त हुकल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यंदापासून मोफत गणवेश योजनेत प्रत्येक गावातील महिला बचत गटाच्या प्रतिनिधी यांना सरकारच्यावतीने कापड पुरवण्यात येणार आहे. त्या कापडातून महिला बचत गटांच्या महिला प्रतिनिधी गणवेश शिऊन देणार आहेत. यासाठीचे नियोजन सुरू झाले असून जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेसह सर्व शासकीय शाळेत शिक्षण घेणारे 2 लाख 30 हजार विद्यार्थी यासाठी लाभार्थी आहेत. मोफत गणवेश योजना राबवण्यासाठी प्रत्येक तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून ही समिती मोफत गणवेशाचे काम पाहणार आहे. जूनमध्ये सुरू होणार्या शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना किमान एक गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक तालुक्यात असणार्या बचत गटाच्या महिला हा गणवेश शिऊन शाळांपर्यंत पोहोचविणार आहेत.
याबाबतचा कार्यारंभ आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आले आहेत. दरवर्षी मोफत गणवेश योजनेत शाळा पातळीवर असणार्या शाळा व्यवस्थापन समितीला पैसे देऊन त्यानुसार गणवेश खरेदी करण्यास सांगण्यात येत होते. मात्र, यंदापासून योजनेच्या अंमलबजावणीत बदल करण्यात आला आहे. यंदापासून राज्य पातळीवरून कापड पुरवण्यात येणार असून हे कापड महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने चालवण्यात येणार्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधी यांच्या मार्फत ते शिऊन घेण्यात येणार आहे. मात्र, अद्याप कापडचा पत्ता नसल्याने विद्यार्थ्यांची मापे कशी ठरवणार, त्यानंतर ते कधी शिवणार आणि शाळेत कसे पोहचणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे यंदा मोफत गणवेशाचा महुर्त शाळेच्या पहिल्या दिवशी हुकण्याची शक्यता आहे.
ठराविक बचत गटाकडे अनेक तालुके
एकाच तालुक्यात असणार्या महिला बचत गटांकडे अनेक तालुक्यातील गणवेश शिवून देण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यामुळे कापड आल्यानंतर देखील एकाच तालुक्यातील महिला बचत गट अनेक तालुक्यातील गणवेश कसे तयार करून देणार हा प्रश्न असल्याची अडचण काही तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासन हतबल
विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेश मिळावे, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे. या गणवेशासाठी कापड वेळत मिळावे, यासाठी शासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मात्र, त्यावर केवळ लवकर कापडाचा पुरवठा होईल, आश्वासन जिल्हा परिषद शिक्षण विभागाला देण्यात आले आहे.
बचत गटाच्या महिला प्रतिनिधींना शाळेच्या इयत्ता आणि विद्यार्थ्यांच्या वयानुसार ठराविक माप कळवून त्यानुसार गणवेश शिऊन घेण्यात येणार आहे. शिऊन घेण्यात येणार्या या गणवेशात एक नियमित गणवेश तर दुसरा स्काऊट गाईडचा असणार आहे. यातील एक गणवेश 1 जूनपर्यंत तर दुसरा गणवेश 15 जून अथवा शाळा सुरू होण्याच्या दिवसापर्यंत शिवून घेण्याचे नियोजन आहे.