Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्याबागलाणमध्ये संततधार; शेमळीत ढगफुटी

बागलाणमध्ये संततधार; शेमळीत ढगफुटी

सटाणा-लखमापूर । प्रतिनिधी Satana

- Advertisement -

सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात मुसळधार पावसाने काल व आज अक्षरश: थैमान घातले. शेमळीत तर अक्षरश: ढगफुटी झाल्याने शेतकर्‍यांचे जनावरांसह मका, चारा वाहून गेला. तालुक्यात संततधार पावसाने कापणीवर आलेली पिके जमीनदोस्त केली.

तर चाळींना पाण्याने वेढल्याने साठवलेला कांदा-मका पाण्यात भिजला. पावसाच्या या रूद्रावताराने केलेल्या अतोनात हानीने शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. आ. दिलीप बोरसे यांनी आज पाहणी करत या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेस दिले आहेत.

रात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने तालुक्यातील नवीशेमळी, जुनीशेमळी, लखमापूर, आराई, अजमीरसौंदाणे, पिंपळदर, दर्‍हाणे, ठेंगोडा, कंधाणे, खमताणे, मुंजवाड, मोरेनगर तसेच ब्राम्हणगाव, डांगसौंदाणे, ताहाराबाद, अलियाबाद, पिंगळवाडे, करंजाड, मुंगसे आदी गावांमध्ये अक्षरश: धुमाकुळ घातला. तब्बल अडीच ते तीन तास सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले गेले. त्यामुळे कांदा-द्राक्षांसह इतर शेतीपिकांची अतोनात हानी झाल्याने शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील नवीशेमळी व जुनीशेमळी शिवारात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अक्षरश: ढगफुटीसारखा धो-धो पाऊस कोसळला. तीन ते चार तास सुरू असलेल्या या वादळी पावसामुळे सुकड पाझर तलाव व जुनी शेमळी येथील पाझर तलाव भरून वाहू लागल्याने सुकड नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठावरील पिके या पुराच्या पाण्यात वाहून गेली. शेमळी येथील परशराम पांडुरंग वाघ या शेतकर्‍याच्या शेतातील शेडमध्ये बांधलेल्या 10 शेळ्या, 5 लहान कोकरू व एक गाईचे वासरू हे ढगफुटीने झालेल्या पाण्यात वाहून गेले.

तर घराजवळच आणून ठेवलेला 16 ट्रॉली मक्यासह गुरांसाठी साठवून ठेवलेला 20 ते 25 ट्रॉली चारा पाण्यात वाहून गेल्याने वाघ यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेमळी शिवारातील अनेक शेतकर्‍यांना या ढगफुटीचा फटका बसून मका, कांद्यासह इतर खरीप पिकांची अतोनात हानी झाली तर संततधार पावसाच्या तडाख्याने अनेक गावात मातीच्या घरांच्या भिंती कोसळल्या.

अजमीरसौंदाणे येथे मुसळधार पावसाने घातलेल्या धुमाकुळाने मका, कांद्यासह इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तलाठी व ग्रामसेवकांतर्फे करण्यास प्रारंभ झाला आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टी व ढगफुटीमुळे कुठेही जिवीतहानी घडली नसल्याचे पोलीसपाटील तेजस वाघ यांनी सांगितले.

ग्रामीण परिसरात शेतीलगत असलेले नाले यापुर्वी बुजविण्यात आल्यामुळे अशा ठिकाणाहून पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होवून शेतीक्षेत्रात पाणी साचल्याची स्थिती आहे. याबाबत तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी स्थानिक पातळीवर तलाठी, ग्रामसेवक आदी घटकांशी चर्चा करून नाले खुले करण्याची कार्यवाही करणार असल्याचे दै.‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

तालुक्यात एकिकडे महाग असलेल्या कांदा उळ्याची शेतामध्ये लागवड करण्यात आल्यानंतर या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ठिकठिकाणी चारा भिजल्यामुळे प्रामुख्याने जनावरांची अडचण होणार असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या