अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेली सुमारे 70 वर्षे देशात आणि राज्यात प्रामुख्याने गावांच्या विकासावर भर देण्यात आला. मात्र त्या काळात शहरांच्या विकासाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले. परिणामी रोजगाराच्या शोधात गावाकडून शहरांकडे स्थलांतर वाढले, शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि झोपडपट्ट्या, अतिक्रमणे, पाणीटंचाई, घनकचरा, आरोग्य व शिक्षणाच्या समस्या गंभीर झाल्या. मात्र 2014 नंतर केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शहरांच्या विकासासाठी ठोस धोरण राबवले गेले. स्मार्ट सिटी, अमृत, प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या योजनांमुळे आज देश व राज्यातील शहरांचा चेहरा-मोहरा बदलत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीच्या वतीने पांजरपोळ मैदान येथे गुरूवारी (8 जानेवारी) दुपारी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आ. मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, आ. विक्रम पाचपुते आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गावांचा विकास होत असताना शहरांकडे दुर्लक्ष झाल्याने शहरांमध्ये मूलभूत सुविधांची कमतरता निर्माण झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठा, भुयारी गटार, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण व रोजगार या समस्या तीव्र झाल्या. मात्र 2014 नंतर केंद्र व राज्य सरकारने शहर विकासावर विशेष लक्ष केंद्रीत केले. स्मार्ट सिटी, आमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाखो-कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. परिणामी पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार व्यवस्था, रस्ते, घरे, नागरी सुविधा यांमध्ये आमूलाग्र बदल झाला असून आज प्रत्येक शहराचा विकास प्रत्यक्षात दिसून येत आहे.
गरीब व मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, अनेक गरीब कुटुंबांकडे स्वतःचे घर नव्हते, तर काहींना घरासाठी जागाही नव्हती. सरकारच्या माध्यमातून त्यांना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली, घरे बांधून देण्यात आली. त्यामुळे लाखो कुटुंबांचे स्वप्न साकार झाले आहे. पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनांमुळे शहरांचे आरोग्यदायी रूप बदलत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण करून चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली आणि त्यातून जिल्ह्याला मोठा निधी प्राप्त झाला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्हा दत्तक घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
विखे पाटील यांनी सिस्पे, ग्रोमोअर यांसारख्या आर्थिक फसवणूक प्रकरणांकडे लक्ष वेधत, या घोटाळ्यांमध्ये हजारो नागरिकांचे कोट्यवधी रूपये अडकून पडल्याचे सांगितले. संबंधित गुन्ह्यांची सीबीआयमार्फत चौकशी करून पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही देत घोटाळेबाजांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नसून त्यांना जेलची हवा खावी लागेल, असे ठामपणे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस आ. जगताप यांनी स्वागत केले, तर डॉ. विखे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.




