नागपूर | Nagpur
नाशिक येथे २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला (Nashik and Trimbakeshwar) जोडणाऱ्या रस्त्यांचे आधुनिकीकरण करण्याच्या नियमनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत नागपूर (Nagpur) येथे बैठक पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) मंत्री व कुंभमेळ्याचे प्रभारी मंत्री गिरीश महाजन, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थितीत होते.
या बैठकीत आगामी सिंहस्थाच्या तयारीसाठी नाशिकला (Nashik) लागून असलेल्या महामार्गांच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची तातडीने गरज लक्षात घेता नाशिकला प्रमुख शहरे आणि शहरांना जोडणाऱ्या महामार्गांच्या विकास आणि सुधारणांना प्राधान्य देण्याबाबत आणि ती जलद करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन बायपास बांधणे आणि पर्यटकांच्या अपेक्षित गर्दीला सामावून घेण्यासाठी प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली लागू करणे या बाबींचा समावेश आहे.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने रोड नेटवर्क तयार करायचे आहे. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा इतर महत्वाचे मार्ग असतील याकरिता केंद्र सरकारने (Central Government) पुढाकार घ्यावा, अशा आशयाचे पत्र लिहिले होते. त्या दृष्टीने आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत नागपूरमध्ये बैठक झाली, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “या बैठकीत नाशिकला जोडणारे छत्रपती संभाजीनगर, नागपूर, धुळे, मुंबई, गुजरात, पालघर यासह इतर प्रमुख आठ रस्ते आहेत, ज्याचा उपयोग सिंहस्थाच्या काळात वाहतुकीसाठी होणार आहे. तसेच काही अंतर्गत रस्ते जे राष्ट्रीय महामार्गाकडे आहे त्या रस्त्यांच्या विकासासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा झाली. या बैठकीत गडकरी यांनी जवळपास सर्वच रस्त्यांना मान्यता दिली आहे. त्यानंतर आता लवकरच या रस्त्यांचा डीपीआर करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे सिंहस्थाच्या काळात जी काही वाहतूक निर्माण होईल, त्यासाठी विस्तारित रोड उपलब्ध होणार आहेत”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीस पुढे म्हणाले की, “द्वारका सर्कल येथे दोन टप्प्यात काम होणार असून, यामधील पहिल्या टप्प्यात सिंहस्थापर्यंत जे काम होईल ते करण्यात येणार आहे. त्यासोबतच सिंहस्थाच्या काळात दुसऱ्या टप्प्याची देखील वर्कऑर्डर देण्यात येईल. मात्र, या कामाला वेळ लागणार असल्याने ते सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर सुरु करण्यात येईल. तसेच नाशिकच्या रिंगरोडला देखील आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम वर्षभरात पूर्ण केले जाणार असून, त्याला देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ मान्यता दिली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?
बैठक संपल्यानंतर मंत्री गिरीश महाजन माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, “यंदा कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांची कामे आहेत. घोटी-त्र्यंबकेश्वर-जव्हार हा रस्ता मुंबईत येणार आहे. त्यामुळे ही वाहतूक घोटीच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचेल. यासाठी ३७०० कोटी रुपये खर्चून चार पदरी रस्ता करण्यात येणार आहे. तसेच नाशिक-सिन्नर रस्त्याचा देखील विस्तार केला जाणार आहे. याशिवाय नाशिककडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची सोय होणार असल्याने त्याचाही विस्तार केला जाणार आहे, असे त्यांनी म्हटले.





