अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित राहत असेल तर ही योग्य बाब नाही. या अहवालाच्या तपशीलात मी अजून गेलेलो नाही. त्याचा संपूर्ण अभ्यास केल्यावर मी याबाबत बोलेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर येथे बोलताना दिली. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मुलाच्या लग्नाला अहिल्यानगर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी हजेरी लावली. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. लग्न सोहळ्यानंतर आ. शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली.
हाफकिनने 71 टक्के औषध पुरवठा न केल्याने राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा ठपका भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालात ठेवण्यात आला आहे. आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण औषधी विभागांतर्गत येणार्या संस्थांसाठी हाफकिनला औषध खरेदीची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, ‘कॅग’च्या अहवालात हाफकिनने 71 टक्के औषध पुरवठा केलाच नसल्याचे समोर आले आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत अशा प्रकारे जर औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित राहिली असेल, तर ती योग्य बाब नाही, असे म्हटले आहे. कॅबिनेटमध्ये जी माहिती देण्यात आली, तेवढीच मी ऐकली आहे. त्या अहवालाच्या तपशीलात मी गेलेलो नाही. त्यावर अभ्यास करून मी बोलेल, असेही त्यांनी सांगितले.