मुंबई | Mumbai
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपल्या देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे कोणतेही संकट नाही. देशात कोणतेही लॉकडाऊन लागणार नाही, तशा आशयाच्या अफवा जर कुणी परसवत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल
“देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे या विषयी कोणतीही अफवा पसरवण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे फेक व्हॉट्सॲप मेसेज जरी फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल. त्यामुळे कुणीही खोट्या अफवा पसवरू नये, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार.”
भारताकडे एका महिन्याचा पुरेसा इंधनसाठा
देशात पेट्रोल पंपांवर लागलेल्या रांगांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या कोणतीही टंचाई नाही. भारताकडे सुमारे एका महिन्याचा पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून जास्त प्रमाणात पेट्रोल-डिझेल खरेदी केल्यास पुरवठा आणि मागणी यामध्ये ताण निर्माण होऊ शकतो आणि कृत्रिम टंचाई उद्भवू शकते. त्यामुळे नेहमीप्रमाणेच इंधन भरावं, असे आवाहन त्यांनी केलेय.
पेट्रोलवरील शुल्क कमी केले
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे १० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा वाढलेल्या किमतीचा भार हा आता तेल कंपन्याच सहन करणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना अधिकच्या दरात पेट्रोल डिझेलची खरेदी करावी लागणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Ashok Kharat Case: भोंदूचा विळखा; मिरगावच्या तीस एकरात खरातच्या भक्तांनी उभारला फार्महाऊसचा डोलारा
आजूबाजूच्या देशांमध्ये शट डाऊनची परिस्थिती
भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शट डाऊनची परिस्थिती आली आहे. अशा वेळी भारतात मात्र घरगुती गॅसची कोणतीही कमतरता भासत नाही. त्यामुळे अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावू नयेत. आपल्याकडे एक महिना चालेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आवश्यक तेवढेच इंधन भरावे
मुख्यमंत्र्यांनी जनतेला विनंती केली आहे की, त्यांनी दररोज ज्याप्रमाणे आवश्यक तेवढेच इंधन भरता, तसेच भरावे. कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये. देशात घरगुती गॅस किंवा पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता भासणार नाही, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.





