Thursday, April 23, 2026
HomeनाशिकAshok Kharat Case: भोंदूचा विळखा; मिरगावच्या तीस एकरात खरातच्या भक्तांनी उभारला फार्महाऊसचा...

Ashok Kharat Case: भोंदूचा विळखा; मिरगावच्या तीस एकरात खरातच्या भक्तांनी उभारला फार्महाऊसचा डोलारा

सिन्नर | विलास पाटील
कुठलाही व्यवसाय करायचा तर आधी गुंतवणूक करावीच लागते. त्याच भावनेतून पुणे मुंबईच्या दोन्ही भक्तांनी मिरगावच्या खरातच्या ३० एकर शेतात स्वतःच्या खर्चाने फार्म हाऊस बांधण्यात पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.

फार्महाऊसच्या कामाच्या निमित्ताने दोघांच्या मिरगावला चकरा वाढल्याची चर्चा होती. इकडे खरातचा व्यवसायही फोफावत होता. त्यातही या दोघांचाच हातभार लागत होता. या दोघांच्या संपर्कातील अनेकांच्या मिरगावला चकरा वाढल्या. खरातच्या भक्तांमध्ये वाढ झाली. या दोघांच्या सांगण्यावरून काहींनी खरात सोबत गुंतवणुकही केल्याची चर्चा आहे. काहींनी अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी गुंतवणुकीला हातभार लावला होता. मध्येच त्याचे खांद्याचे, हाताचे दुखणे पुढे आले. सर्व उपचार संपले. दोघांमधील मुंबईच्याच मित्राने थेट अमेरिकेत नेऊन हातावर उपचार केले, शस्त्रक्रिया केली. ईशान्येश्वर मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली होती.

- Advertisement -

इकडे फार्महाऊसचे काम पूर्णत्वाकडे चालले होते. या कामात दोन्ही भक्तांनी कुठलीही कसर ठेवली नव्हती. खरातसह सर्वच या कामावर खुश होते. मात्र, कामात गुंतवणूक करणाऱ्यांना परताव्याची निश्चिती दिसत नव्हती. खरात व्ही. व्ही. आय. पी. मध्ये गुंतत चालला होता. त्यातून यांची अस्वस्थता वाढू लागली होती. आता तर भेटीही दुर्मीळ होऊ लागल्या होत्या. बोलणंही कमी होऊ लागलं होतं. रविवार वगळता नेहमीच मुंबईसह बाहेर असणाऱ्या खरातला भेटणे अवघड होऊ लागले होते. कदाचित खरात आपल्याला टाळतोय अशीही भावना दोघांमध्ये निर्माण होऊ लागली होती.

Ashok Kharat Case: अशोक खरातचा आंतरराष्ट्रीय खेळ; पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या पैश्यावर परदेशात मजा

मामला अध्यात्माशी जोडलेला असला तरी खाण्यावर कुठलेही बंधन नव्हते. मांसाहार व्यर्ज नव्हता. मदिरेलाही कुणाचा आक्षेप नव्हता. त्यामुळे फार्महाऊसला मुक्काम झाला तरी चिंता नसायची. मंदिराच्या मागे काय चालते, कोणत्या पूजा होत आहेत याच्यात त्या दोघांनाही इंटरेस्ट नव्हता. एवढ्यात गूढ अशा पूजा मळ्यातल्या विहिरीजवळ होऊ लागल्या होत्या. खरातने तयार केलेल्या ब्रँड औषधांना मागणी वाढली होती. खरात भेटला नाही तरी हे खास औषध मिळण्यात अडचणी नव्हत्या.

स्वयंपाकी सर्वांच्या परिचयाचा झाला होता. पूजाअर्चेसह इतर कामात तो मदत करायचा. अनेक पूजा तो स्वतःही दुरून बघायचा. औषधाच्या रेसिपीकडेही त्याचे लक्ष होते. डोळ्याला दिसत होते. मात्र, कुणाशी बोलण्याचा विषय नव्हता. ‘आपण भले आणि आपलें काम भले’ असाच एकूण त्याचा शिरस्ता होता. दोघे अधून-मधून येत होते. कधी मुक्कामही करीत होते. तसे ते दोघेही खरातच्या अगदी जवळचे, आतल्या गोटातले म्हटले तरी चालेल. त्यामुळे खरातच्या सर्व साम्राज्यात त्यांचा मुक्त संचार असायचा. कुणी त्यांना अडवण्याचा विषयच नव्हता. ते नेहमीच यायचे.
खरातच्या साम्राज्याचा होत असलेला विस्तार त्यांनाही दिसत होता. त्यातच आपलं भविष्य अधांतरीच असल्याचे त्यांना जाणवत होतं.

फार्महाऊस बरोबरच शेतीतल्या फळबागा बहरु लागल्या होत्या. मंदिरासमोरची जागा अशाच एका भक्ताने स्वतः विकत घेऊन संस्थानला दान केली होती. त्यावरही सभागृहासह अनेक बांधकामे झाली होती. असे चांगलं चित्र असतानांही ते अस्वस्थ होऊन जायचे. आपलं भविष्य काय हा प्रश्न त्यांना सतावत रहायचा. असंच एकदा ते फार्म हाऊसवर आले. तेव्हा सर्वत्र तसा शुकशुकाटच होता. फक्त स्वयंपाकी होता. मात्र, तोही आपल्या कामात गर्क होता. दोघांचा त्याच्याशी परिचय तर चांगलाच होता. मात्र, साहेबाचा नवा धंदा एवढा कसा तेजीत आलाय याबद्दल दोघांनाही संशय होता. गप्पांच्या ओघात स्वयंपाक्यालाच त्यांनी विश्वासात घेतलं आणि खरातच्या यशाचं गुपित विचारलं. जरा भीत भीतच त्याने काही सांगायला सुरुवात केली. तो जे सांगत होता, ते ऐकून दोघेही हादरलेच. (क्रमशः)

मंदिरापेक्षा कार्यालयात गर्दी
महिन्यातील जवळपास सर्वच रविवार खरात मंदिरात थांबू लागला. येणाऱ्या भक्तांना एंटरटेन करू लागला. पुढे मंदिराच्याच बाजूला शिवनिका संस्थानची दुमजली इमारत उभी राहिली. त्यातील दुसऱ्या मजल्यावरील केबिन खरातचं कार्यालय बनलं. सर्वसामान्य भक्त परिवार मंदिरात दर्शन करून परतू लागले तर मंदिरापेक्षा खरातचा सल्ला घेण्यासाठी येणाऱ्यांची या कार्यालयात रीघ लागू लागली.

ताज्या बातम्या

Kopargaon : पश्चिमेचे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याबाबत चालढकल थांबवा

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून अरबी समुद्रात वाहून जाणारे पश्चिमेचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात वळवण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारची उदासीनता आता न्यायालयाच्या रडारवर आली आहे....