रांजणगाव देशमुख |वार्ताहर|Ranjangaon Deshmukh
राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत असताना शिर्डी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्यात बंद दाराआड 15 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे लोणी आणि कोपरगाव येथील नियोजित कार्यक्रमासाठी शिर्डीत मुक्कामी होते. याचवेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शिर्डीत होते. या भेटीदरम्यान, संजीवनी युनिव्हर्सिटीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा धनादेश विवेक कोल्हे आणि त्यांच्या कुटुंबियांनी फडणवीस यांना सुपूर्द केला. या कार्यक्रमानंतर फडणवीस आणि विवेक कोल्हे यांच्यात स्वतंत्रपणे चर्चा झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. विशेषतः कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसना संदर्भात या चर्चेत सकारात्मक बोलणी झाल्याचे बोलले जाते. या बैठकीत केवळ दोनच व्यक्ती असल्याने चर्चेचा नेमका तपशील कळू शकला नाही. मात्र या भेटीमुळे विवेक कोल्हे यांचे राजकीय वजन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या भेटीनंतर दुसर्या दिवशी कोपरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विवेक कोल्हे यांचे जाहीर कौतुक केले. राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्दही यावेळी देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात सातत्याने विवेक कोल्हे यांचा ‘युवा नेते’ असा उल्लेख केला. ज्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जात असल्याचे स्पष्ट झाले.
ही गुप्त भेट आणि त्यानंतर नेत्यांनी केलेले कौतुक या दोन्ही घटना कोल्हे यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या घडामोडींमुळे लवकरच विवेक कोल्हे यांची राजकीय वर्तुळात नवी भूमिका दिसण्याची शक्यता आहे. यावर अधिकृत दुजोरा लवकरच मिळण्याची शक्यता आहे.




