पुणे | Pune
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांना गुरुवारी पुण्यात दिमाखदार सोहळ्यात ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ (Lokmanya Tilak National Award) प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील खास उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा आणि अजित डोवाल यांचा धुरंधर व चाणक्य असा उल्लेख केला.
एका धुरंधरकडून दुसऱ्या धुरंधरला पुरस्कार
या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांनी एक नवीन दिशा दिली आणि आपले संपूर्ण जीवन हे राष्ट्राकरिता समर्पित ठेवत आजही राष्ट्रीय सुरक्षेसाठी जे कार्य करत आहेत, अशा अजित डोवाल यांना मिळाला असल्यामुळे, याचा मला मनापासून आनंद आहे. तसेच विशेष आनंद हा आहे की, एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाते, त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा आणि अजित डोवाल यांचे कौतुक केले.
Raj Thackeray: …त्याची माफी कोण मागणार? पंतप्रधानांच्या व्हिडिओवर राज ठाकरेंची टीका
भारत हा मार खाणारा देश राहिला नाही
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, 2014 साली पंतप्रधान मोदी यांनी अजित डोवाल यांना आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केले. त्यानंतर अजित डोवाल यांनी देशाच्या सुरक्षेचं डॉक्टरिन होतं, ते पूर्णपणे बदलण्याचे काम केले. अजित डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेची रणनीती, कूटनीती तयार केली. आता भारत हा मार खाणारा देश राहिलेला नाही, तर मोदींच्या नेतृत्वाखाली घरात घुसून मारणारा देश झाला आहे. हा महत्त्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये अजित डोवाल यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांचे एक अतिशय महत्त्वाचे वाक्य आहे. ते असे म्हणतात की, ‘There is no silver medal in national security. If you win, you make history. If you lose, you become history.’ अशा पद्धतीने अतिशय परखडपणे आपले मत मांडणारे अजित डोवाल आहेत. ज्याप्रकारे त्यांनी वेळोवेळी आपला जीव धोक्यात घालून या देशासाठी कार्य केले, आज खरोखर त्यांच्यासारख्या व्यक्तीला, ज्यांनी कधीही पदक आणि पुरस्काराचा विचार केला नाही, अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळत आहे, ही आपल्या सगळ्यांकरिता आनंदाची गोष्ट आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.




