मुंबई | Mumbai
मुंबईत झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडत सरकारवर जोरदार टीका केली. बदलत्या काळानुसार विद्यार्थी संघटनांनीही बदलणे गरजेचे असल्याचे सांगताना त्यांनी ‘जेन झी’ पिढीला समजून घेण्याचा सल्ला दिला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत जंतर-मंतरवर त्यांच्याबाबत आणि त्यांच्या आईबद्दल जी आक्षेपार्ह भाषा वापरली गेली, त्यावरून आक्षेप घेतला. यावरुन राज ठाकरे यांनी सुनावले.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ वरुन त्यांचा समाचार घेतला आहे. यावेळी ते म्हणाले, जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ज्याप्रकारची भाषा वापरण्यात आली, ती अयोग्य होती. हे आम्हाला मान्य आहे. कुणाच्याही बाबतीत अशाप्रकारची खालची भाषा वापरली जाऊ नये, हे मला १०० टक्के मान्य आहे. मला फक्त पंतप्रधानांना एवढेच सांगायचे आहे की, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा”, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या शुक्रवार रात्रीच्या व्हिडीओला उत्तर देताना म्हटले.
गोदावरीत ४९३८२ क्युसेकने विसर्ग; पावसाचा जोर, जायकवाडीत उपयुक्त साठा ७५ टक्क्यांवर
तुमची ट्रोलर्सची टीम कोणत्या भाषेत ट्रोलिंग करते ते पहा
याच विषयावर बोलत असताना राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, “महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून आमच्यापर्यंत तुमची ट्रोलर्सची टीम कोणत्या भाषेत ट्रोलिंग करते, तेही एकदा पाहा. महाराष्ट्रातील अनेक कलाकार काही बोलायला घाबरतात. प्रत्येक राज्यात त्यांनी अशा टीम बसवल्या आहेत. त्यांनाही शिव्या देऊ नका, असे सांगावे.”
१२ वर्ष तुमच्या लोकांनी जे केले, त्याची माफी कोण मागणार?
“गेल्या १२ वर्षांत ट्रोलिंगची सुरुवात झाली. तुम्ही जे पेरले तेच तुमच्या अंगाशी आले आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या गेल्या. ते चुकीचेच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुमच्या पक्षातल्या लोकांना तुम्ही सांगितले पाहिजे. त्यांनीही मर्यादा पाळल्या पाहिजेत. तुम्ही जंतर-मंतरवरच्या मुलांना माफ केले, असे सांगता. पण १२ वर्ष तुमच्या लोकांनी जे केले, त्याची माफी कोण मागणार?”, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
मुलांचं म्हणणं काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे
यावेळी त्यांनी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, “मी ज्यावेळी कामाला सुरुवात केली, तेव्हाचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ पूर्णपणे वेगळा आहे. तेव्हाचे विषय वेगळे होते, आजचे विषय वेगळे आहेत. तेव्हाचे विद्यार्थी वेगळे होते आणि आजचे विद्यार्थीही वेगळे आहेत. आता ‘जेन झी’ची पिढी आहे. या मुलांचं म्हणणं काय आहे, त्यांना नेमकं काय हवं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे.”
भाषणादरम्यान विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “माझी विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की, ‘जेन झी’ म्हणजे फक्त इंग्रजी बोलणारी मुंबई, पुणे किंवा दिल्लीतील मुलं नाहीत. १९९७ नंतर जन्माला आलेली मुलं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही आहेत. त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या आशा आणि त्यांची विचार करण्याची पद्धत समजून घेणं आवश्यक आहे. जुन्या कल्पना आता सोडल्या पाहिजेत,” असे राज ठाकरे म्हणाले.




