नागपूर | Nagpur
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनंतर अवघ्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र यानंतर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. अनेक नेत्यांनी शपथविधीसाठी घाई केल्याचे म्हटले आहे. तसेच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर या शपथविधीवरून टीका केली होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनील तटकरे यांनी अतिशय गलिच्छ राजकारण केले आहे. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडले, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. रामदास कदम यांनी केलेल्या टीकेबाबत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.
जे काही वादविवाद होत आहे ते निरर्थक
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी (ता. 6 फेब्रुवारी) नागपुरातून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला असे वाटते की, या संदर्भात जो काही वादविवाद होत आहे, तो अतिशय निरर्थक आणि चुकीच्या प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचे राजकारण कसे पाहता येईल, हा प्रयत्न करत आहे. हे अतिशय चुकीचे आहे.
राजकारण करण्याचा प्रयत्न अतिशय चुकीचे आहे
शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले, एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रुपाने दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले आहेत. पण, त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्या माध्यमातून जे काही राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, ते अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे अशाप्रकारचे खालचे राजकारण बंद झाले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला
दरम्यान, प्रसंग कठीण होता. पण, ज्या धीरोदात्तपणे सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे. शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही. पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.





