रायगड । Raigad
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त अमित शाहांनी रायगडाला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार व खासदार उदयनराजे आणि अन्य नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अपमान करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे अशी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत खासदार उदयनराजे यांनी मागणी देखील केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास शासनाकडून प्रमाणित करण्यात येईल”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी कायदा करण्यात येईल. उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या आहेत. छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे. खरे तर टकमक टोकावरून त्यांचं कडेलोटच केला पाहिजे. मात्र आपण लोकशाहीमध्ये राहतो. त्यामुळे त्या संदर्भात नियमावली तयार करण्यात येईल. शिवरायांच्या स्मारकाचा विषय सुप्रीम कोर्टातून हायकोर्टात आला आहे. आता आम्ही हायकोर्टात लढा देऊन स्मारक उभारणीच्या लढ्यात यश मिळवू.”
दरम्यान या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत ठेवू नका, असे म्हटले. जिजाऊंनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही, तर बाल शिवाजीला स्वराज्याचा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचे महान कार्य त्यांनी केले, असे अमित शाह यावेळी म्हणाले.
रायगडावरील सुवर्ण सिंहासनाच्या ठिकाणी शिवरायांना अभिवादन करताना आपल्या मनातील भावना शब्दांत मांडणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. स्वराज्य आणि स्वधर्मासाठी शिवरायांनी संपूर्ण आयुष्य वेचले. आदिलशाही आणि निजामशाहीने वेढलेल्या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्यात रूपांतरित करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले, असेही शाह म्हणाले. शिवाजी महाराजांच्या जन्मकाळात महाराष्ट्र अंधारात बुडाला होता, स्वधर्म आणि स्वराज्याबद्दल बोलणे गुन्हा मानले जात होते, असे सांगत शाह यांनी शिवरायांच्या साहसाची थोरवी अधोरेखित केली. शिवरायांनी भगवा झेंडा फडकवण्याची आणि स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. मी अनेक नायकांची चरित्रे वाचली, पण शिवरायांसारखे साहस आणि पराक्रम एकाही नायकात दिसले नाही, असे शाह म्हणाले.