Tuesday, December 10, 2024
Homeनगरविकासामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकासामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये समाजातील प्रत्येक घटकासाठी जी विकास कामांची गंगा आणली. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्तर वर्षांच्या कार्यकाळामध्ये विरोधकांना जे शक्य झाले नाही, ते मोदी यांनी फक्त दहा वर्षांत करून दाखविले आहे, अशा शब्दांत विरोधकांचा समाचार घेत लोकसभेच्या झालेल्या तीन टप्प्यांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळणार असल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

- Advertisement -

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर येथे आयोजित संकल्प सभेत ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आ. आशुतोष काळे, माजी आ. भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, चंद्रशेखर कदम, स्नेहलता कोल्हे, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, अर्चना पानसरे, रिपाइंचे सुरेंद्र थोरात, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पटारे, नितीन दिनकर, कमलाकर कोते, बाबुशेठ टायरवाले, बाबासाहेब शिंदे, प्रकाश चित्ते, बबन मुठे, शुभम वाघ, विठ्ठलराव राऊत आदींसह तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने देशात मोदी यांची तर शिर्डी लोकसभा मतदार संघात सदाशिव लोखंडे यांची हॅटट्रीक होणार आहे. त्यामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी लोखंडे यांना बळ द्या. श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांना तुम्ही मतदान करणार का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, सर्व विरोधक घोटाळेखोर आहेत. देशासाठी चोवीस-चोवीस तास काम करणारा पंतप्रधान मोदी यांच्या रुपाने देशाला मिळाला आहे. त्यांच्याच हातामध्ये देश मजबूत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राहुल गांधी परदेशात जावून पंतप्रधानांची, देशाची बदनामी करतात. भारत जोडो नावाने भारत तोडो यात्रा काढतात. त्यांना तुम्ही मते देणार का? काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे, तो पाकिस्तानची भाषा बोलतो.

म्हणून हिंदुस्थानमधला प्रत्येक नागरिक पेटून उठला पाहिजे. या काँग्रेसची धुळधाण केली पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शरद पवार म्हणतात, सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, उबाठाचे पहिल्यापासून काँग्रेसीकरण झालेले आहे. सावरकरांचा अपमान करणार्‍यांना ते काहीही बोलत नाहीत, ते बाळासाहेबांचे विचार विसरले. बाळासाहेब म्हणाले होते, काँग्रेसला लांब ठेवा, काँग्रेसपासून लांब रहा, माझी काँग्रेस होऊ देणार नाही, आणि माझी काँग्रेस होईल, तेव्हा माझे शिवसेना दुकान बंद करेल. बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले आणि आज काँग्रेसची भाषा, पाकिस्तानची भाषा बोलणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे, असा टोलाही ना. शिंदे यांनी लगावला.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दोन्ही खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशाचा सर्वांगिण विकास होत आहे. विरोधकांकडे कुठलाच अजेंडा नाही, ते दिशाहीन आहेत. देशाचे भविष्य मोदी यांच्या हातामध्ये सुरक्षित असल्याने महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या