राहाता । प्रतिनिधी
राज्यातील साखर उद्योग अडचणीत असताना सरकारने त्यांना मदतीचा हात दिला, मात्र आता शेतकऱ्यांवर संकट असताना काही कारखानदारांना नफ्यातून फक्त ५ रुपये देणेही जड जात आहे, अशी टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वजनात काटा मारणाऱ्या कारखान्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
लोणी (ता. राहाता) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नुतनीकरणाच्या शुभारंभावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन १० रुपये आणि पूरग्रस्तांसाठी ५ रुपये कर आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या निर्णयाला काही साखर कारखानदारांकडून विरोध झाल्याने फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सरकारने साखर उद्योगाच्या अडचणीच्या काळात नेहमी साथ दिली. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांनी आर्थिक मदत केली. पण जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले, तेव्हा काहींना स्वतःच्या नफ्यातील फक्त ५ रुपये देणंही परवडलं नाही. हे अतिशय खेदजनक आहे.”
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “आपण केवळ ५ रुपये शेतकऱ्यांसाठी देण्याची विनंती केली होती. फार तर २५ लाख रुपयांचा भार एका कारखान्यावर आला असता. पण त्यावरून काहींनी अनावश्यक गोंधळ घातला, जणू शेतकऱ्यांकडूनच पैसे काढले जात आहेत. काही कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनावेळी काटा मारला जातो, अशी माहिती मिळाली आहे. अशा कारखान्यांना मी स्वतः पाहतो आणि योग्य कारवाई करणार आहे.”
सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे स्पष्ट करत फडणवीस म्हणाले, “कारखान्याचे मालक शेतकरीच आहेत, त्यामुळे त्यांच्या हिताचे रक्षण हेच आमचे प्राधान्य आहे. आपत्तीकाळात काही लोक राजकारण करत आहेत, पण सरकार शेतकऱ्यांसाठी ठामपणे काम करत राहील. केंद्र सरकारकडूनही भरीव मदतीचा आराखडा तयार होत आहे.”
या प्रसंगी फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले. “अमित भाईंनी सहकार मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यावर ८ ते १० हजार कोटी रुपये महाराष्ट्रातील सहकारी संस्था बळकट करण्यासाठी उपलब्ध करून दिले. त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील सहकारी चळवळीला नवी उभारी मिळाली आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी फडणवीस यांनी शेतकरी व कारखानदारांना एकतेचा संदेश देत सांगितले, “जनतेने आम्हाला सेवा करण्यासाठी पाठवले आहे. आम्ही सेवा करू, राजकारण नव्हे.” या कार्यक्रमाला स्थानिक नेते, सहकारी क्षेत्रातील मान्यवर आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमुळे लोणी येथील विखे कारखान्याच्या परिसरात उत्साहाचे वातावरण होते.




