मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
केंद्रात सत्ता आल्यावर एका झटक्यात गरीबी दूर करू असे काँग्रेसचे राहुल गांधी (Rahul Gandhi) सांगतात, यामागे मोठे षडयंत्र आहे. हिंदूच्या संपत्तीचे सर्व्हेक्षण करून त्यावर विरासत कर आकारणी करत तुमच्या पुर्वजांनी जी संपत्ती तुम्हाला सोपवली आहे त्यातून ५० टक्के संपत्ती काँग्रेस काढून घेवून ती मुस्लीमांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसची ही विरासत कर प्रणाली म्हणजे औरंगजेबचा झिजिया कर आहे. यावरून औरंगजेबाची आत्मा काँग्रेसमध्ये घुसली असल्याचे स्पष्ट होत असल्याने महाराष्ट्र औरंगजेबाला स्विकारणार का? असा प्रश्न करत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी खायचे भारतात व गोडवे पाकिस्तानचे गाणाऱ्यांना इथे कुठलाच थारा न देता छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपला (BJP) साथ देण्याचे आवाहन येथे बोलतांना केले.
धुळे मतदारसंघातील (Dhule Loksabha) महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamare) यांच्या प्रचारार्थ आज येथील कॉलेज मैदानावर आयोजित विराट सभेत मार्गदर्शन करतांना उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर शब्दांचा अक्षरशः चौफेर हल्ला चढवत देशाच्या विकासासाठी, रक्षणासाठी पुन्हा मोदी सरकार विराजमान करण्याचे आवाहन केले. बुलडोझर याया अशी ओळख निर्माण केलेले योगी आदित्यनाथ मालेगावी येत असल्याने त्यांचे विचार ऐकण्यासाठी शहरासह तालुक्यातून आलेल्या हजारो नागरीकांनी कॉलेज मैदान अक्षरशः गर्दीने फुलून गेले होते. दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सभास्थळी आगमन होताच जय श्रीरामच्या घोषणांनी उपस्थितांनी मैदान दणाणून सोडत त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी एकवीरा मातेला नमन करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर समाजसुधारक महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जन्म देणाऱ्या या पवित्र भुमीस आपण नमन करतो. या भुमीत जेव्हा मोगलांचा आतंक-वर्चस्व होते औरंगजेबाने हिंदूंवर झिजिया कर लावला व न देणाऱ्यांचे तो धर्मांतर करत होता. त्या काळात छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकावत औरंगजेबाचा अहंकार नेस्तनाबूत करण्याचे काम केले.परंतु, आपणांस आश्चर्य याचे वाटते काँग्रेसचा अध्यक्ष आपल्या संस्कारानुसार सांगतो की काँग्रेसचे सरकार आले तर राममंदिर धुवून काढू परंतु, उत्तरप्रदेशची जनता त्यांना हे करण्याच्या स्थितीत ठेवणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे.
श्रीराम मंदिराची निर्मिती हा १४० कोटी जनतेच्या भावनेचे प्रतीक आहे. महाराष्ट्रासह देशातील जनतेने पंतप्रधानपदी स्विकारल्याने मोदी यांनी काँग्रेसचा कलंक पुसायचे काम करत राम मंदिर स्थापित केले. पाचशे वर्षाची प्रतिक्षा संपली यापेक्षा देशवासियांसाठी गर्वाची दुसरी कोणतीच गोष्ट असू शकत नसल्याचे योगी यांनी सांगत काँग्रेसच्या राम मंदिरावरील भूमिकेवर कडाडून टीका केली. तसेच ‘अबकी बार चारशे पार’चा नारा भाजपसह संपूर्ण देशातील जनता देत असल्याने इंडिया आघाडीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे ते या घोषणेबाबत विचारणा केल्यावर जनताच त्यांना सांगत आहे, ज्यांनी रामास आणले त्यांना आम्ही आणणार त्यामुळे मोदी परत येणार यात कुठलीच शंका नसल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस (Congress) इंडिया आघाडी ‘जितेंगे तो मिलके लुटेंगे’ या भावनेतून निवडणूक लढवित आहे. तर आत्मनिर्भर व विकसित भारत निर्माण करण्याच्या संकल्पाने भाजप निवडणूक मैदानात उतरली आहे. आमच्यासाठी निवडणूक सत्ता प्राप्तीचे साधन नाही. गरीबांच्या चेहऱ्यावर हस्, वंचितांना त्यांचे अधिकार, तरूणांना रोजगाराची उपलब्धता, अन्नदाता शेतकऱ्यास त्याचे हक्क मिळावे व महिला तरूणींना आर्थिक स्वावलंबनाच्या मार्गावर नेणे, देशाच्या विरासतला सन्मान मिळवून देत विकासाच्या पथावर देशाला संपुर्ण विश्वात अग्रणी राष्ट्र म्हणून स्थापित करण्यासाठी भाजप ही निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, मोदी सरकारच्या दहा वर्षात देशाचा विकास झाला व संपुर्ण विश्वात सन्मान मिळाला. २०१४ पूर्वी सीमा सुरक्षित नव्हत्या, आतंकवादी हल्ले सुरू होते, देशाचा विकास थांबून भ्रष्टाचार वाढला होता. गरीब भुकबळीने मरत होते तर शेतकरी आत्महत्या करत होते. महिला व व्यापारी असुरक्षित होते, हिंदूच्या सणापुर्वी दंगली होत होत्या. मात्र मोदी सरकार सरोवर येताम हे सर्व बंद झालें. साथा फटाका फुटला तरी आज पाकिस्तान घाबरून आपला संबंध नसल्याचे सांगत आहे. यावरून देश कुणाच्या हातात सुरक्षित आहे हे लक्षात घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री दादा भुसे, डॉ. सुभाष भामरे, खा. अनिल बोंडे, आ. दिलीप बोरसे, आ. मंगेश चव्हाण, डॉ. तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, बबनराव चौधरी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅड, रविंद्र पगार आदींची भाषणे झाली. तसेच व्यासपीठावर खा.अजित गोपछडे, आ. जयकुमार रावल, इंद्रदेव महाराज, धुळे जि.प. अध्यक्ष धरती देवरे, ज्येष्ठ नेते सुरेशनाना निकम, सुनिल गायकवाड, राजेंद्र फडके, गजेंद्र अंपळकर, लकी गिल, रिपाइं जिल्हाध्यक्ष भारत जगताप, सुरेखा भुसे, मनिषा पवार, नितीन पोफळे, संजय भामरे, नितीन सोनवणे, राहुल सोनवणे, श्रीधर कोठावदे, देवा पाटील, किशोर इंगळे, मुकेश झुनझुनवाला, सतिष पवार, भरत पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, मनसे शहराध्यक्ष राकेश भामरे, भारत चव्हाण, दादा जाधव, समाधान हिरे, सुनिल मोरे, मदन गायकवाड, दीपक गायकवाड, रविष मारू, गुलाब पगारे, संदीप पाटील, प्रदिप बच्छाव यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सभेस हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.