Friday, November 22, 2024
Homeक्राईमआचारसंहितेच्या 24 दिवसांत फक्त 15 गावठी कट्टे सापडले

आचारसंहितेच्या 24 दिवसांत फक्त 15 गावठी कट्टे सापडले

पोलिसांची जुजबी कारवाई || जिल्ह्यात कट्ट्यांसह प्राणघातक शस्त्रांचा सुळसुळाट

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्यांसह प्राणघातक हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तलवारी, चाकू आदी शस्त्रांचा सुळसुळाट झाला आहे. 15 ऑक्टोबर रोजी विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हा पोलिसांनी कट्टे, शस्त्रांवर कारवाया सुरू केल्या आहेत. मात्र 24 दिवसांत पोलिसांना फक्त 15 कट्टे, 22 काडतुसे व 39 प्राणघातक शस्त्रे मिळून आली आहेत. गुन्हा करताना मोठ्या प्रमाणात कट्टे आणि शस्त्रांचा वापर होत असताना ते सापडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

- Advertisement -

गुन्हा करताना सराईत गुन्हेगारांकडून गावठी कट्ट्यांचा वापर वाढला आहे. नुकताच तिसगाव येथील एका तरुणाचा गावठी कट्ट्यांतून गोळ्या घालून खून करण्यात आला. हा खून गावच्या उपसरपंचाने केला असल्याचे तपासातून समोर आले. जिल्ह्यात अशा एक ना अनेक घटना नेहमी घडत असतात. तलवार, चाकू या सारख्या शस्त्रांचा वापर तर प्राणघातक हल्ला करण्यासाठी नेहमीच केला जातो. पोलिसांकडून अशा शस्त्रांवर कारवाया केल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याला बेकायदेशीर अग्नीशस्त्र (गावठी कट्टे) बाळगणारे, घातक शस्त्रांसह अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. विधानसभा निवडणुका निर्भीड वातावरण व प्रलोभन विरहीत होण्याकरिता पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत. मात्र अपेक्षीत कारवाया केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.

15 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या 24 दिवसांच्या काळात एलसीबीसह जिल्ह्यातील सर्व पोलिसांनी मिळून फक्त 14 ठिकाणी कारवाई करून 15 गावठी कट्टे आणि 22 जिवंत काडतुसे जप्त केली आहे. संबंधित गावठी कट्टे बाळगणार्‍या व्यक्तींविरूध्द आर्म अ‍ॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 35 ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये तलवार, चाकू असे प्राणघातक 39 शस्त्रे मिळून आली आहेत. ते बाळगणार्‍या संबंधित व्यक्तींविरूध्द आर्म अ‍ॅक्ट 4/25 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

फक्त देखावा
निवडणूक लागल्याने अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक ओला यांनी दिले. प्रत्येक पोलीस ठाण्यातून एखादी दुसरी कारवाई करून कारवाई केल्याचा देखावा केला जात आहे. पोलिसांनी ठरवले तर शेकडो गावठी कट्टे आणि इतर शस्त्र त्यांना सापडतील, मात्र पोलिसांकडून जुजबी कारवाई करून वेळ मारून नेली जात असल्याचे दिसून येत आहे.

अनेकांचा घेतला जीव
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश देऊन देखील पोलिसांनी गावठी कट्टे व शस्त्रांवर म्हणावी तशी कारवाई केलेली दिसून येत नाही. जिल्ह्यात गावठी कट्टे सहज उपलब्ध होतात. खरेदीपासून विक्रीपर्यंत त्याची साखळी आहे. त्यात अनेक सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. कट्ट्यांतून अनेकांचा जीव गेला असताना पोलिसांना ते सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या