Friday, November 22, 2024
Homeनगरआचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत सी-व्हिजिल अ‍ॅपवर तक्रार करा; जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत सी-व्हिजिल अ‍ॅपवर तक्रार करा; जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असून निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांनी सी- व्हिजिल अ‍ॅपव्दारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले आहे. या अ‍ॅपवर दाखल होणार्‍या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी- व्हिजिल अ‍ॅप विकसित केले आहे. या मोबाईल अ‍ॅपव्दारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सी- व्हिजिल अ‍ॅपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. सी- व्हिजिल अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त अ‍ॅप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. अ‍ॅप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

सी-व्हिजिल अ‍ॅप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडते. या अ‍ॅपच्या अचूकतेसाठी अ‍ॅपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हीडिओ घेतले जातात. जेणेकरून भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल, असे जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

परवानग्यांसाठी ‘सुविधा 2.0’ मोबाईल अ‍ॅप
निवडणूक आयोगाने ‘सुविधा 2.0’ हे मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून याव्दारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेव्दारे मिळणार आहेत. यापूर्वी फक्त ऑनलाईन पोर्टलवरच अर्ज सादर करता येत होते, पण आता नवीन अ‍ॅपव्दारे सर्व प्रक्रिया मोबाईलवरून करता येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. ‘सुविधा 2.0’ हे मोबाईल अ‍ॅप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अ‍ॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया, निवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या