अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या. यापैकी एका विनानंबर दुचाकीमध्ये एक लाख रूपयांची रोकड आढळून आली असून, ही रक्कम महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने पंचनामा करून जप्त केली आहे. ही घटना मंगळवारी (6 जानेवारी) सकाळी दिल्लीगेट परिसरात घडली.
मतदारांना पैशांचे वाटप सुरू असल्याची माहिती मंगळवारी सकाळी तोफखाना पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त असलेल्या भरारी पथकाला देखील पाचारण करण्यात आले. घटनास्थळी उपस्थित पोलीस व भरारी पथकातील अधिकार्यांनी नागरिकांसमोर संबंधित दुचाकी मालकांनी पुढे यावे, असे आवाहन केले. त्यानुसार एका दुचाकीचा मालक पुढे आला. पंचासमक्ष त्याच्या दुचाकीची डिक्की उघडून तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही रोकड आढळून आली नाही.
मात्र काही कागदपत्रे मिळून आली. दरम्यान, दुसरी दुचाकी विनानंबरची असून तिचा मालक घटनास्थळी पुढे न आल्याने ती दुचाकी पंचासमक्ष सील करून तोफखाना पोलीस ठाण्यात आणण्यात आली. पोलीस ठाण्यात पोलीस, भरारी पथकातील अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत सदर दुचाकीची डिक्कीचे लॉक तोडून तपासणी करण्यात आली. यावेळी डिक्कीमध्ये एक लाख रूपयांची रोकड आढळून आली. त्यानंतर भरारी पथकाने सदर रक्कम पंचनामा करून ताब्यात घेतली. दरम्यान, उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मतदारांना पैशांचे वाटप केले जात असल्याची माहिती पसरताच दिल्लीगेट परिसरात पक्षाचे कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस व निवडणूक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.




