निफाड। प्रतिनिधी Niphad
सत्ता असली तर सर्वच सोबत असतात. मात्र सत्ता गेली तरी सोबत राहणारे सहकारी कायम आठवणीत राहतात. त्यामुळे राजकीय उभारी मिळते.कर्मवीर मालोजीराव मोगल यांच्या जयंती व पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त निफाड तालुक्यातील चितेगाव फाटा येथे आयोजित अभिवादन व शेतकरी मेळाव्याला उद्देशून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मालोजीराव मोगल यांना अभिवादन करतांंना केले.
आपल्या भाषणात सांगितले की, संकटाच्या काळात जे मदतीला थांबतात तेच आठवणीत राहतात. कारण ते संकटात साथ देतात. सत्ता असल्यानंतर तर सगळेच थांबतात, पण ती गेल्यानंंतर आधार देणारे व परत उभारी साठी साथ देणार्यांपैकी मालोजीराव मोगल होते. 35 आमदार त्यावेळी मला सोडून गेले. नाशिक जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम बघितले व 14 आमदारांंची फौज नाशिक जिल्ह्यातून माझ्या पाठीमागे उभी केली. ती उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी राजकारण करतांंना समाजकारणावर जोर देत निसाका व मविप्र सारख्या संस्था चालवितांना संस्थांचा विचार केला, व संस्था पुढे कशा जातील हाच उद्देश राजकारण व समाजकारण करतांना ठेवत शेतकरी केंद्रबिंदू ठेवून आपल्या कर्तृत्वाने ते सर्वांच्या लक्षात राहिले. ते आज आपल्यात नाही, पण त्यांच्या विचाराने व कार्याने मोगलांच्या नवीन पिढीचे नेतृत्व राजेंद्र मोगल पुढे नेत आहे. स्व. मालोजीराव मोगलांचे राहिलेले काम पुढे नेण्यासाठी राजेंद्र मोगलांना जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात करत निफाडकरांना साद घातली.
प्रास्ताविकात कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र मोगल यांनी सांगितले की, शरद पवार जो उमेद्वार निफाड तालुक्यासाठी देतील, तोच आमचा पक्ष व चिन्ह राहिल, हे सांगत असतांना स्व.मालोजीराव मोगलांवर प्रेम करणार्या जिल्हाभरातून आलेल्या सर्वांचे याप्रसंगी त्यांनी ऋण व्यक्त केले. तर तालुक्याच्या वतीने निफाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप मोरे यांनी निसाकाचा 13 ते 14 लाख टन ऊस डोळ्यासमोर ठेवून या ऊस उत्पादकांकडे पर्यायाने निसाकाकडे शरद पवारांनी लक्ष घालुन कांदा व निसाकाचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे, यासाठी त्यांनी शासनदरबारी आपले वजन वापरून शेतकर्यांचे अश्रू पुसण्यासाठी मदत करावी, असे सांगितले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांनी आपल्या भाषणात माझ्यासारख्या शिक्षकाला खासदार करण्याची ताकद फक्त शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या राजाकडेच आहे, म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्यातील व्यक्ती आज खासदार होऊ शकली. माझी पुढील राजकीय कारकिर्द ही शेतकरी केंद्रबिंदू ठेवूनच शरद पवारांच्या विचारावर लोकसभेत मांडण्यासाठी मी प्रयत्न करणार, असे त्यांनी सांगितले. अॅड.पृथ्वीराज मोगल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी लासलगाव बाजार समिती तथा मविप्र सभापती बाळासाहेब क्षिरसागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, कादवा चेअरमन श्रीराम शेटे, ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे, रयत शिक्षण संस्था उपाध्यक्ष अॅड.भगीरथ शिंदे, माजी आमदार मारोतराव पवार, माजी आमदार अनिल कदम, मविप्र अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, माजी आमदार दिपिका चव्हाण, माजी आमदार कांतीलाल चव्हाण, माजी सभापती जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे, रासाका मा.चेअरमन दत्तात्रय डुकरे, चांदोरी सरपंच विनायक खरात, माणिकराव बोरस्ते, हेमलता पाटील, माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, डॉ.सयाजी गायकवाड, सोनिया होळकर, गणेश गिते, गोकुळ गिते, विलास मत्सागर, संपत डुंबरे, मधुकर शेलार, प्रकाश अडसरे, विलास वाघ, रोहिदास कदम, दशरथ जेऊघाले आदींसह निफाड तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी निफाड पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या उपस्थितीत सायखेडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी वर्गाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.