Saturday, July 6, 2024
Homeनंदुरबारयापुढे पुष्पगुच्छांचा वापर न करता बचत गटाने तयार केलेले किट वापरणार

यापुढे पुष्पगुच्छांचा वापर न करता बचत गटाने तयार केलेले किट वापरणार

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

- Advertisement -

जिल्हयात होणार्‍या शासकीय कार्यक्रमात स्वागत, सत्कारासाठी पुष्पगुच्छ न देता महिला बचत गटांनी (Women’s self-help groups) उत्पादीत केलेल्या वस्तुंचे किट देण्यात येईल, जेणेकरुन महिलांचे सक्षमीकरण होवून महिला उद्योजिका तयार होवू शकतील, असे प्रतिपादन नुतन जिल्हाधिकारी मनिषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड (Collector Dr. Rajendra Bharud) यांची पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्याजागी नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त श्रीमती मनिषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती खत्री यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज स्विकारला. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. श्रीमती खत्री म्हणाल्या, आपण यापुर्वी जळगाव जिल्हयातील पाचोरा, अमरावती, नागपूर याठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे.

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत असतांना तेथील मेळघाट या आदिवासी भागात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आदिवासी भागातील समस्यांची जाण आहे. नंदुरबार हादेखील आदिवासी जिल्हा असल्याने येथेही सक्षमपणे काम करण्यावर भर दिला जाईल. श्रीमती खत्री म्हणाल्या, कोरोनाच्या दोन लाटा नंदुरबार जिल्हयाने समर्थपणे पेलल्या आहेत. परंतू तिसर्‍या लाटेच्या धोक्याची शक्यता लक्षात घेता, नंदुरबार जिल्हयात बालकांसाठी कोरोनाचे नवीन कक्ष उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आतापासूनच करण्यात येणार आहेत. सध्याच्या कोरोना कक्षातही आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करण्याचे नियोजन आहे, असेही त्या म्हणाल्या. कोणताही शासकीय कार्यक्रम असो त्याठिकाणी पुष्पगुच्छांचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. परंतू स्वागत, सत्कारानंतर पुष्पगुच्छांचा कुठलाही उपयोग हाेत नाही.

त्यामुळे यापुढे प्रत्येक शासकीय कार्यक्रमात स्वागत किंवा सत्कारासाठी पुष्पगुच्छांचा वापर केला जाणार नाही, त्याऐवजी बचत गटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या छोटयामोठया वस्तूंची किट तयार करुन ती सत्कारासाठी वापरली जाणार आहे. जेणेकरुन महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळेल, त्यांचे सक्षमीकरण होईल, रोजगार निर्मिती होईल, परिणामी महिलांचे उत्पन्न वाढून महिला उद्योजक म्हणून पुढे येतील, असेही श्रीमती खत्री म्हणाल्या.

नंदुरबार जिल्हयात कुपोषण, स्थलांतर, रोजगार हे प्रश्‍न आहेतच, त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करुन हे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. वेगवेगळया योजनांचे एकत्रीकरण करुन मोठा प्रयोग राबविण्यावर भर दिला जाईल, जास्तीत जास्त लोकांना शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही श्रीमती खत्री यांनी सांगितले. खाजगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांकडून मोठया प्रमाणावर बिल आकारले जाते. याबाबत कोणाची तक्रार आल्यास संबंधीत कोविड सेंटरवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही श्रीमती खत्री यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या