अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कांद्याचे कोसळलेले भाव, तसेच दूध दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. 5) रोजी शेतकरी जनआक्रोश आंदोलन पुकारले आहे. दुसर्या दिवशी शनिवारी हे आंदोलन सुरूच होते. शनिवारी याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात जनावरे बांधत महिलांनी चुली पेटवत अनोखे आंदोलन केले. दरम्यान, सकाळी किर्तन आणि त्यानंतर दुपारी सरकारच्या नावाने गोंधळ घालण्यात आला. आज आंदोलनाला राज्यातील बडे नेते भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.
कांदा आणि दुधप्रश्नी करण्यात येत असलेल्या या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या. तसेच गायी, म्हैशी व बैलगाड्यांसह लोक आंदोलनात सहभागी झाले. यावेळी हातात निषेधाचे फलक घेऊन घोषाणाही देण्यात आल्या. हभप कृष्णा महाराज कुर्हे यांचे किर्तन झाले. यावेळी आळंदी येथील विश्वानंद आधात्मिक वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना साथसंगत दिली. त्यानंतर दुपारी एक वाजता छत्रपती संभाजी नगर येथील अनिल बुधे पार्टीचा गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले होते. दिवसभर शेतकर्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे झाली. आंदोलनात सहभागी जनावरांना हिरव्या चार्याची कुट्टी करून देण्यात आली. तर शेतकरी आणि कार्यकर्त्यांना याच ठिकाणी राणीताई लंके यांच्या नेतृत्वाखाली चूल पेटवून जेवण तयार करण्यात आले.
आंदोलनात महाविकास आघाडीचे राजेंद्र फाळके, बाबासाहेब भोस, महादेव राळेभात, राजेंद्र आघाव, भगवान फुलसौंदर, संदेश कार्ले, संदीप वर्पे, रोहिदास कर्डिले, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, किरण काळे, किरण कडू, संभाजी कदम, संदिप कर्डिले, प्रकाश पोटे, शिवशंकर राजळे, शरद झोडगे, रोहिदास कर्डिले, अर्जुन भालेकर, योगीराज गाडे, रामेश्वर निमसे, डॉ.राम कदम, संतोष पटारे आदींसह शेतकरी सहभागी झाले. दूध आणि शेतीमालाच्या हमी भावावरून अनेक शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. दूध दर वाढीबाबत शासनाने कायम स्वरूपी कायदा करावा. शेतकर्यांच्या दुधाला 40 रुपये दर मिळावा.
संपूर्ण कर्जमाफी व कांदा आणि इतर शेतीमालाला योग्य हमी भाव द्यावा. राज्यातील मंत्री शेतीमाल तसेच दुधाबाबत गंभीर नाहीत. केंद्रीय गृहमंत्री आणि दूध दरवाढीचा काय संबंध? हे सरकार शेतकर्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोप खा. लंके यांनी यावेळी केला. दरम्यान, आज खा. सुप्रिया सुळे, खा. बजरंग सोनवणे, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. बाळासाहेब थोरात येणार आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन राज्यव्यापी आंदोलन होणार आहे, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी स्पष्ट केले.