Sunday, September 8, 2024
Homeनगरआपत्ती काळात कोणीही मुख्यालय सोडू नये

आपत्ती काळात कोणीही मुख्यालय सोडू नये

जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश || मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांनी सज्ज राहावे, आपत्तीच्या काळात 24 तास नियंत्रण कक्ष सुरू राहील याची दक्षता घ्यावी, आपत्ती काळात कोणीही मुख्यालय न सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले. दरम्यान, जिल्ह्यातील शाळाखोल्या, अंगणवाड्यांची गरजेनुसार दुरूस्ती करून घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

- Advertisement -

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे हे प्रत्यक्ष तर शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, जिल्ह्यातील मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सर्वोतोपरी सज्ज राहावे. पूरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी सुरक्षित निवार्‍याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे निवार्‍यांची पहाणी करून त्याबाबत सुक्ष्म असे नियोजन करण्यात यावे.

आपत्तीच्या काळामध्ये विद्युतपुरवठा तसेच दूरध्वनी सेवा अखंडित सुरू राहील याची संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी दक्षता घ्यावी, साथींच्या रोगापासून बचाव होण्यासाठी तसेच रोगराई पसरल्यास निदानासाठी उपायोजना आखून ठेवण्याबरोबरच प्रत्येक शासकीय रुग्णांलयांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या शोध व बचाव साहित्यांची तपासणी करण्यात येऊन काही बिघाड असल्यास ते तातडीने दुरूस्त करून घेण्यात यावे. आपत्तीच्या काळामध्ये झालेल्या नुकसानीचे संयुक्तरित्या पंचनामे करण्यात येऊन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा. तसेच या काळात नागरिकांनी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करत सर्व विभागाच्या अधिकार्‍यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिले.

जनावरांचे इयर टॅगिंग करण्याच्या सूचना
नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनावरांना मुबलक प्रमाणात चार्‍याची उपलब्धता ठेवण्यात यावी. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरे मृत्युमुखी पडल्यास ज्या जनावरांचे टॅगिंग करण्यात आले आहे, अश्याच जनावरांच्या मालकांना शासनामार्फत मदत करण्यात येते. त्यामुळे प्रत्येक जनावरांचे इयर टॅगिंग होईल, यादृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या.

अपघातांच्या ठिकाणी बोर्ड्स, रिफ्लेक्टर लावण्याचे आदेश
मान्सून कालावधीत रस्त्यांवर पाणी साठल्यामुळे अनेकवेळा अपघात घडतात. ज्या ठिकाणी अशा प्रकारे पाणी साठून अपघात घडतात अशा अपघातांच्या ठिकाणी बोर्ड्स, रिफ्लेक्टर लावण्यात यावेत. अनेकवेळा पाऊस व वार्‍यामुळे झाडे रस्त्यांवर उन्मळून पडतात ज्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशी झाडे तातडीने बाजूला करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. पावसाळ्यात पाण्यामुळे एस. टी. बसेस बंद पडतात. परिणामी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे एस. टी. बसेसची आवश्यकतेनुसार दुरूस्ती करून घेण्याबरोबरच एस.टी.बसेस ट्रॅकिंग सिस्टीम अद्ययावत करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या