अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बांधकाम ठेकेदाराकडे लाच मागणी केल्याचा आरोप असलेले नगर महानगरपालिकेचे तात्कालिन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, डॉ. जावळे यांना जामीन मिळताच समस्त आंबेडकरी समाजाच्यावतीने महानगरपालिकेसमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
बांधकाम परवानगीसाठी आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन मनपा आयुक्त जावळे व स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आयुक्त जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायलयाने नामंजूर केला होता. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांना उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. याची माहिती मिळताच समस्त आंबेडकरी समाजाच्यावतीने मनपासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, कौशल गायकवाड आदी उपस्थित होते.