अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बांधकाम परवानगीसाठी आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात नगर जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर आता तत्कालीन मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात 31 जुलैला सुनावणी होणार आहे. दरम्यान, त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी नगर न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
कल्याण रस्त्यावरील एका जागेवर बांधकामाला परवानगी देण्यासाठी जावळे व देशपांडे यांनी आठ लाखांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सापळा कारवाई प्रस्तावित होती. मात्र, सापळा फसल्याने या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 27 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून दोघेही पसार आहेत. जावळे यांनी नगरच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी आता उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.
त्यावर गुरूवारी (18 जुलै) सुनावणी होऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले. यावर आता 31 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. श्रीधर देशपांडे यांच्या वतीने अॅड. महेश तवले यांनी नगरच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.