Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून व्यावसायिकाची 10 कोटींची फसवणूक !

Crime News : कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून व्यावसायिकाची 10 कोटींची फसवणूक !

सॉफ्टवेअरमधील नोंदींमध्ये फेरफार || दोघांविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील इलाईट इंटरनॅशनल या फर्ममध्ये काम करणार्‍या अकाउंटंटने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फर्मच्या टॅली सॉफ्टवेअरमधील नोंदींमध्ये फेरफार करून, बनावट नोंदी करून तब्बल नऊ कोटी 81 लाख 66 हजार 957 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. जानेवारी 2020 ते जानेवारी 2025 या कालावधीत हा अपहार झाला असून, या प्रकरणी दोघांवर मंगळवारी (27 मे) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अभिजीत विनोद गांधी (वय 38, रा. कराचीवाला नगर, अहिल्यानगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पुनित अभयराज गुगळे (रा. कोर्ट गल्ली, अहिल्यानगर), अन्सार निसार शेख (रा. गजराजनगर, छत्रपती संभाजीनगर रस्ता, अहिल्यानगर) या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पुनीत हा अकाउंटंन्ट म्हणून इलाईट इंटरनॅशनल या फर्ममध्ये काम करत असताना त्याने फर्मच्या अकाउंटचा युजर आयडी वापरून, फर्मच्या संपूर्ण टॅली सॉफ्टवेअर मधील व्यवहाराच्या खोट्या नोंदी दाखवल्या. त्याच्या जवळच्या व्यक्तीशी हातमिळवणी करून वेगवेगळ्या बनावट नोंदी करून कस्टम ड्युटी, इन्कम टॅक्स, इन्शुरन्स पॉलिसी, कंपनीचे सप्लायर्स अशांच्या नावाने खात्यावर पैसे ट्रान्सफर केले असे दाखवले.

YouTube video player

मात्र, सदरच्या रकमा या त्याने त्याच्या नातेवाईकांच्या व ओळखीच्या व्यक्तींच्या खात्यावर वर्ग केल्या. तसेच, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स भारत सरकार यांचे बनावट पत्र तयार करून या विभागाला 48 लाख रूपये भरणा केल्याचे दाखविले. फिर्यादीने याबाबत खात्री करून संशयित आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने 24 लाख रूपये पुन्हा फर्मच्या नावे टाकले. दरम्यान, फिर्यादीने खात्री केली असता शासनाच्या कोणत्याही खात्यावर अशा प्रकारे टॅक्स भरणा होत नसल्याचे समोर आले. त्यामुळे खोट्या नोंदी घेऊन, बनावट सहीचे पत्र बनवून फिर्यादी व शासनाची फसवणूक केल्याची व 9 कोटी 81 लाख 66 हजार 957 रूपयांचा अपहार केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी होऊन तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. गोटला हे करत आहेत.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक...