नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने मोटार अपघातप्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या विद्यमान कमाईत, भविष्यातील संभाव्य संपूर्ण कमाई जोडूनच नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
अपघातात मृत्यू पावलेल्या उत्तराखंडातील व्यक्तीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. हा निर्णय देताना नुकसानभरपाईच्या रकमेत सर्वोच्च न्यायालयाने वाढ केली आहे.
संबंधिताला विमा कंपनीने न्यायालयाने वाढवलेली 17 लाख 50 हजार रुपये इतकी नुकसानभरपाई द्यावी. यासोबतच या रकमेवर साडेसात टक्के व्याजही दिले जावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. विशेषाधिकाराचा प्रयोग करीत नुकसानभरपाईची रक्कम वाढवल्याशिवाय पीडितांना संपूर्ण न्याय मिळणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.