Friday, May 3, 2024
Homeनाशिककवींकडून करोनाच्या वेदनांवर फुंकर

कवींकडून करोनाच्या वेदनांवर फुंकर

नाशिक | Nashik
वसंत व्याख्यानमालेत नाशिकच्या कवींनी कवितांच्या माध्यमातून कोरोनावर हळुवार शब्दांची फुंकर घातली. अमाप वेदना घेऊन जगणाऱ्या माणुसमनाला या कवितांनी जगण्याला उर्मी दिली.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत आयोजकांनी दहावे पुष्प गुंफण्यासाठी कवी संमेलनाचे आयोजन केले होते आणि निमित्त होते स्व. प्रा. सुरेश मेणे यांच्या स्मृतींचे. महामारीच्या या काळात संपूर्ण लोकमानस उद्विग्न झालेय, या पार्श्वभूमीवर ‘कोरोना कविता’या विषयावर कवींनी मनातील आशयघन व्यक्त करून समाजाच्या भावनांना जणू वाट करून दिली. प्रा. गंगाधर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात गझलकार जयश्री वाघ म्हणतात,

- Advertisement -

ही अज्ञानातून लिपी उमगते आहे, अन काळोखाची अगम्य निर्गम भाषा…हे हात कधीचे हातातून सुटले आहे, का उगी धावती पाय घेउनी आशा… अभिनेते अजय बिरारी म्हणतात, नको चुंबने नको आलिंगन, राहू आपण सारेच दूर..नको स्पर्श, नको जवळीक कोरोनाचा आत्मगुण…या ओळीतून बिरारी यांनी कोटुंबिक पण प्रेमवत्सल भावनांना वाट करून दिली.

शिक्षक नेते संजय चव्हाण यांनी कुठं ठिगळ लावू आभाळ फाटले, आजार असा कसा हे प्रेम आटले, या काव्य पंक्तीतून सामान्य माणसाची व्यथा बोलून दाखविली… राजेंद्र उगले यांनी देवालाच सवाल केला. तुझ्यावरची भोळी श्रद्धा खोटी ठरवतो का, देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला ? एकाच भडकलेल्या चितेवर धगधगनारे अनेक, चितेच्या राखेवर आपलाच मृतदेह कित्येक…

या स्पर्शकाळात इथे होम हवनाला आले नाही उधाण, पेटली नाही यज्ञकुंडे, की झाली नाही अजान..* असे संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गंगाधर अहिरे यांनी यावेळी बाेलून दाखवले. यावेळी शंकर बोऱ्हाडे, संतोष वाटपाडे, जयश्री कुलकर्णी, संजय गोरडे आदींनी विषयानुरूप कविता सादर केल्या. सूत्रसंचलन रविंद्र मालुंजकर यांनी केले, तर मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या