मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष वाढत आहे. विशेषतः बिबट्याशी सामना होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळते. मानव आणि प्राणी दोघांनीही त्यांच्या सीमा थोड्याश्या ओलांडल्या असाव्यात का? प्राणी माणसांवर हल्ला करतात. क्वचित माणसांचा जीव घेतात. त्यांच्या पिकाचे नुकसान करतात, अशी मानवाची तक्रार असते. प्राण्यांना मानवासारखे बोलता येत नाही. त्यामुळे त्यांची बाजू पर्यावरणवादी मांडतात.जंगल कमी होत आहे.
प्राण्यांचा अधिवास आकसत आहे. भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय मानवाने ठेवलेला नाही, असे मत मांडतात. तथापि ‘ज्याचे जळते त्यालाच कळते’ असे म्हणतात. त्याप्रमाणे जे प्राण्यांचे बळी ठरतात त्यांच्या भावना तीव्र असल्या तर नवल नाही. तथापि मानवी वर्तनसुद्धा अनेकवेळा आक्षेपार्ह नसते का? गडचिरोलीत हत्तींचा शासकीय कॅम्प आहे. या कॅम्पमधील एक हत्तीण त्या परिसरात फिरत होती. तिने एका दुचाकीस्वाराची गाडी सोंडेत धरून आपटली. तो दुचाकीस्वार तिला त्रास देत असल्याचे निष्पन्न झाल्याच्या बातम्या माध्यमात प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या कॅम्पच्या सूत्रांनीदेखील कॅम्पमधील हत्तीने कोणावर हल्ला केल्याची घटना प्रथमच घडली असल्याचे माध्यमांना सांगितले. शहरी भागात वारंवार बिबटे आढळत आहेत. त्यांनी माणसावर हल्ला केल्याच्या किंवा माणसांनी गर्दी करून त्याला सळो की पळो केल्याचेही आढळते. लोक व्याघ्र सफारीला जातात. तेथेही मानवाच्या आक्षेपार्ह वर्तनाचे व्हिडीओ अधूनमधून समाजमाध्यमांवर फिरतात.
असे का घडते? शिवाय लोक जिथे जातात तिथे कचरा तयार करतात. त्यांनी बेफिकिरीने फेकलेला कचरा प्रसंगी प्राण्यांचा फास बनतो. अर्थात कोणा एकाला दोषी मानणे अयोग्य ठरेल. प्राण्यांचा मानवाला त्रास होतो किंवा प्राणी माणसाला त्रास देतात हा मानवाचा दावा क्षणभरासाठी खरा मानला तरी पृथीवरून प्राणी नाहीसे होऊ शकतील का? जंगल आणि वन्यजीवांशिवाय मानवाचे अस्तित्व शक्य आहे का? माणूस आणि प्राण्यांची तुलना होऊ शकत नाही. माणसे विचार करू शकतात. भावना शब्दात प्रकट करू शकतात. त्यांना बुद्धीचे वरदान आहे. तेच प्राण्यांच्या भावना समजावून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. प्राण्यांना त्यांच्या मर्यादा आहेत. वनविभागाच्या मदतीने अनेक सामाजिक संस्था असे अनेक उपक्रम राबवतात. उदाहरणार्थ मुंबईच्या संजय गांधी उद्यान परिसरात ‘बिबटयासह जगा’ (लिव्हिंग विथ लेपर्ड) ही मोहीम अनेकांच्या सहकार्याने राबवली गेली. ती कमालीची यशस्वी ठरली. या मोहिमेमुळे बिबट्या आणि मानव संघर्षाच्या घटना घडण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याचे सांगितले गेले. नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये वाघोबाला समजावून घेताना’ हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने राबवला गेला. विद्यार्थ्यांना बिबट्याविषयी आवश्यक ते ज्ञान दिले गेले. विद्यार्थ्यांनी ते त्यांचे पालक आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवले. प्राण्यांशी कसे वागावे? त्यांचे मानवी वस्तीवरच्या आक्रमणाचे प्रसंग कसे हाताळावेत? यासाठी लोकशिक्षण मोहीम सर्वांच्या सहकार्याने अंमलात आणावी लागेल. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात. तसे ते येऊ नयेत यासाठी त्यांना त्यांच्या अधिवासात पाणी उपलब्ध करून देता येऊ शकेल. संघर्षाच्या प्रसंगांना आळा घालण्यासाठी दीर्घकालीन धोरण ठरवले गेल्याचे सांगितले जाते. ते तसे खरेच ठरले आहे का? अमलात आणले जाते का? याविषयी लोकांना अवगत केले जात असावे का? वन्यप्राण्यांचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व, हल्ल्याच्या घटनांमध्ये नुकसानभरपाईबाबत लोकांना अवगत करावे लागेल. वन्यप्राण्यांकडून झालेल्या जीवित-वित्तहानीची भरपाई तत्काळ मिळायला हवी ही मागणी रास्त खरी. तथापि एकमेकांचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे हे विसरता येणार नाही.